Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | four accused flee police custody in kolhapur

पोलिस झोपल्याचे पाहून कोठडीचे गज तोडून पळाले 4 आरोपी, गंभीर गुन्ह्यात झाली होती अटक

प्रतिनिधी | Update - May 18, 2018, 04:06 PM IST

त्यांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शाहुवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते

  • four accused flee police custody in kolhapur

    कोल्हापूर- घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी लॉकअपच्या दरवाजाचे ग्रील वाकवून धूम ठोकल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. आज शुक्रवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार शाहूवाडी पोलीस ठाण्यातच घडला. पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून गुन्हेगार पळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

    सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठार पैकी कासारवाडी, ता. हातकणंगले),ओंकार महेश सूर्यवंशी (वय 19, रा. बँक ऑफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गोविंद वसंत माळी (वय 19, रा. यशवंतनगर कॉलनी, कासेगाव, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (वय 19, रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.


    पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून चक्क चार गुन्हेगारांनी पोलीस कोठडी तोडून पलायन केल्याने हडबडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात तात्काळ नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकेसुद्धा रवाना करण्यात आली आहेत.
    पलायन केलेले चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शाहूवाडी पोलिस ठाण्यात 3/2018 कलम 454, 457 आणि 380 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शाहूवाडी न्यायालयाने त्यांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.आज पहाटे 4 ते 5 या वेळेत आरोपींनी पोलीस कोठडीचे लोखंडी गज वाकवून पलायन केल्याने रात्रीच्या कर्तव्यावर असणारे पोलीस काय झोपा काढत होते का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.तसेच घटनेत दोषी पोलिसांवर कारवाई होणार का असाही सवाल केला जात आहे.

Trending