आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको; पंकजा मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवार कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्यावरच भर रणरणत्या उन्हात ठाण मांडून अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलनही केले.यावेळी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सगळा रोष काढण्यात आला.

 

'कांद्यात कांदा कुजका कांदा आणि पंकजा मुंडेना बोचक्यात बांधा',त्याचबरोबर भाजीत भाजी अंबाडी आणि सरकार करतय लबाडी, अशा घोषणा देवून आपला संताप व्यक्त करणाऱ्या या आंदोलक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परीसर दुमदुमून सोडला. मोर्चा श्रमिक विकास संघाच्या वतीने काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व कॉ.आप्पा पाटील यांनी केले.

 

निवेदनात,वाढत्या महागाईमुळे आणि इतर मुलभूत मागण्यांसाठी संपूर्ण देशभरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आंदोलन करत आहेत.यात कोल्हापूर जिल्हयातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाले आहेत.मात्र राज्य सरकार त्यांच्या मागण्यांबाबत वारंवार खोटी आश्वासने देत आहे.त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आमच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचा मोर्चा काढून निवेदन देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनवाढीसाठी व अन्य मागण्यांसाठी सप्टेबर महिन्यात 26 दिवस बेमुदत संप करण्यात आला होता.राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या सोबत 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या चर्चेनुसार 2 लाख सेविका आणि मदतनिसांनी हा संप मागे घेतला.
या बैठकीत मान्य झालेल्या तडजोडीनुसार त्वरित शासकीय आदेश काढणे आवश्यक असताना शासनाने 5 महिन्यांनी आदेश काढून 23 फेब्रुवारी रोजी मानधन वाढ जाहीर केली.यामध्ये कर्मचाऱ्यांची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
त्याचबरोबर तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या सेविकांना शासनाने वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत नोकरीवर ठेवण्याचे मान्य केले होते.परंतु या आदेशानुसार गरज नसताना सेवा निवृत्तीचे वय 65 वरून 60 करण्यात आले.त्यामुळे सुमारे 10 हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना घरी बसावे लागणार आहे.त्यामुळे हा अन्याय सरकारने करू नये असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

आपल्या मागण्यांमध्ये मानधन वाढ ऑक्टोबर पासून मिळावी,सेवा निवृत्तीचे वय पूर्वीप्रमाणे 65 करावे,अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना किमान वेतन 18 हजार मिळावे,सेवानिवृत्त झाल्यावर 3 हजार पेंशन मिळावी,नवीन व रिक्त अंगणवाडी सेविकांची भरती करावी,या व अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.या आंदोलनात कॉ.जयश्री पाटील,सरिता कंदले,शमा पठाण,शोभा भंडारे,विद्या कांबळे,मंगल माळी,अंजली क्षीरसागर,सुमन शिरगावे,सुनंदा कुऱ्हाडे,हसीना मखमल्ला,सुषमा कदम आणि कॉ.रघु कांबळे यांच्या बरोबर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून पाहा... अंगनवाडी से‍विकांच्या रास्ता रोको अांदोलनाचे फोटो..

 

 

बातम्या आणखी आहेत...