आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- केंद्र सरकारने आपल्या मालकीच्या बँकांचे नुकसान भरुन काढण्यासाठी 80 कोटींचे अनुदान दिले. आठ महिण्यापुर्वीही याच बँकांना 1 लाख 20 हजार कोटी दिले होते. या बँका नुकसानात जातात कशा? बँकाचा पैसा थकवतो कोण असा प्रश्न उपस्थित करत सरकार बँकाचा पैसा बुडवणा-या धनिकांना पाठीशी घालत असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. लोकनेते कै.सदाशिवराव मंडलिक यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे शनिवार (दि.10) रोजी स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शरद पवार बोलत होते. राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पत्रकार प्रतापसिंह जाधव, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, खा.राजू शेट्टी आणि कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले कि, निसर्गाचा कोप झाला, शेती मालाला किंमत मिळाली नाही आणि सोन्यासारखं पीक हातातून गेले तरच शेतकरी बँकाचा पैसा थकवतो. शेतकऱ्याची जात पैसा थकवायची नाही. घेतलेला पैसा परत केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही असे सांगून कोकणात एका दौऱ्यावेळी वयोवृद्ध आंबा शेतकरी महिलेने बँकेच्या 20 हजाराच्या कर्जाचा किस्सा सांगून ते म्हणाले कि, 'ती महिला म्हणाली 20 हजाराचं कर्ज फेडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, गारपीठ झाली, आंबा गेला पण 20 हजाराचं कर्ज डोक्यावरून गेल्यावरच देवाने मला घेऊन जावं. त्या महिलेला विचारल्यावर ती म्हणाली, मेल्यावर जो घास ठेवला जाईल त्याला कावळा शिवला नाही तर पुढच्या पिढीला यातना होतील त्या होऊ नये म्हणून कोणाचा दमडा सुद्धा थकवायचा नाही'. शेतकरी कोणाचा पैसा थकवत नाही. पैसा परत करण्याबाबत काळजी घेतो. मात्र हे सरकार शेतकऱ्यांना काहीच देत नाही उलट जे पैसा बुडवत आहेत अशा धनिकांनाच संरक्षण देण्याचे काम करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अॅग्रीकल्चर, एज्युकेशनल अँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक यांनी कै.सदाशिवराव मंडलिक यांचा जीवनपट उलगडवून सांगितला, प्रा.जे.एफ पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ,माजी खासदार कल्लापा आवाडे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही कै.सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यशैलीचे पैलू उलघडून सांगितले.
यावेळी बी व्ही जी समुहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने तर माजी डॉ.जयसिंगराव पवार यांना त्यांच्या इतिहासं संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देवून तसेच आदिवासी विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.स्मिता कोल्हे आणि डॉ.रवींद्र कोल्हे (अमरावती), कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नाशिकच्या सह्याद्री समुहाचे विलास शिंदे, उद्योग व नव तंत्रज्ञान राज्यस्तरीय पुरस्काराने भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांना शरद पवार आणि राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील यांच्या हस्ते लोकनेते कै.सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुढील स्लाइडवर पाहा, कार्यक्रमाचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.