आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर- टेंबलाईवाडीत भटक्या कुत्र्यांची दहशत, 26 जणांना चावा घेऊन केले गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- टेंबलाईवाडी परिसरात चार भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बालकांसह २६ जण गंभीर जखमी झाले.जखमींना तात्काळ उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने संतप्त नागरिकांनी चार पैकी दोन कुत्र्यांना पाठलाग करून ठार मारून टाकले.

 

या घटनेची अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील टेबलाईवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठया प्रमाणात झाला आहे. परिसरात राहणाऱ्या लोकांना व लहान मुलांना या कुत्र्यांचा वारंवार त्रास होत आहे. आज दुपारी या परिसरात पिसाळलेल्या चार कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. कुत्र्यांनी एक आणि दीड वर्षांच्या बालकासह महिला आणि पुरुष अशा २६ जणांवर हल्ला केला. त्यात हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.

 

एक वर्षाची बालिका स्वरा प्रशांत हावळ, दीड वर्षाचा प्रवीण दिगंबर केसरकर याच्यासह इंद्रनील संभाजी कांबळे,करण सतोष देसाई, गुंजन गजानन माने, वैष्णवी सतीश पाटील, ईश्वर रवींद्र वाघमारे अशी जखमी बालकांची नावे आहेत . तर विनायक नाना काटे, लक्ष्मी ब्रम्हदेव यादव, सुरेखा सोनाजी वासुदेव, अमित विजय मुंगळीकर, सौरभ सतीश पिंपळे या नागरिकांना सुद्धा कुत्र्यांनी चावे घेऊन जखमी केले आहे. या जखमींना उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर यापैकी काहींना अन्य  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे टेंबलाईवाडी परिसरात घबराट पसरली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...