आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- कृष्णाकाठचा ‘ढाण्या वाघ’ म्हणून कधीकाळी जरब निर्माण केलेले व नंतर प्रवचनकार बनलेले बापू बिरू वाटेगावकरांचे मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय १०३ वर्षे असल्याचा दावा आहे. मात्र, ते नव्वदीच्या पुढेच असावेत, असा अंदाज आहे. त्यांच्यावर इस्लामपूर (जि. सांगली) येथील रुग्णालयात उपचार चालू होते. बापूंचा उल्लेख कथा, पोवाडे, कीर्तनातून झाला. त्यांच्यावर चित्रपटही निघाला. सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यात चार दशके बापूंनी स्वतःची सरकार समांतर यंत्रणा उभारली होती. अडल्या-नडल्यांना मदत, ग्रामस्थांना छळणाऱ्यांचा कर्दनकाळ अशी ‘रॉबिनहूड’ पद्धतीची बापूंची प्रतिमा हाेती. गावाला त्रास देणाऱ्या बारा गावगुंडांना गोळ्या झाडून संपवणाऱ्या बापूंनी तत्त्वासाठी स्वतःच्या मुलालाही गोळ्या घातल्या होत्या.
तब्बल २५ वर्षे पाेलिसांना गुंगारा
रंगा या गुंडाचा खून केल्यानंतर पुढची २५ वर्षे बापू पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होते. लोक त्यांच्याकडे गाऱ्हाणी घेऊन येऊ लागले. ते लाेकांच्या मदतीला धावून जाऊ लागले. त्यामुळे ग्रामस्थांची पूर्ण सहानुभूती त्यांना हाेती. त्यामुळेच पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. सांगली-कोल्हापूरच्या उसाच्या फडात ते लपून राहायचे. लोक त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायचे.
महिलांवरील अत्याचारांविरुद्ध चीड
महिलांवरील अत्याचारांची त्यांना चीड होती. हुंडा, देण्याघेण्याच्या प्रकारावरून न नांदवणाऱ्या नवरोबांनाही बापू दम द्यायचे. त्यांच्यामुळे अनेक संसार सुरळीत झाले. माहेरवाशिणींना न्याय द्यायला बापूंनी शब्द टाकला तर सासरचे लोक तो पाळत. गावातल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पोटच्या पाेरालाही गोळ्या घालून त्यांनी ही नीतिमत्ता सिद्धही केली होती.
प्रवचनकार बापू
जन्मठेप भोगून सुटल्यानंतर ते प्रवचन, व्याख्याने देत. अखेरपर्यंत मांसाहार, दारू, पान, तंबाखू, बिडी, गुटखा याला स्पर्श केला नाही. ‘पैसाअडका ही खरी संपत्ती नाही. अंगात ताकद पाहिजे. नदीच्या पान्यासारखं रक्त अंगात खेळलं पायजे. ६० वर्षांत मी कुठलंही व्यसन केलं नाही,’ असा उपदेश ते तरुणांना करत.
हेही वाचा,
> बापू बिरू नावाचं कैवारी वादळ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.