Home | Maharashtra | Pune | 33 Died in Bus collapsed in 500 feet deep in Poladpur valley

आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून 33 ठार, कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 29, 2018, 08:23 AM IST

जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सक

 • 33 Died in Bus collapsed in 500 feet deep in Poladpur valley

  पुणे - जोडून आलेल्या सुट्या आनंदात घालवण्यासाठी दापोलीहून महाबळेश्वरला निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांसाठी शनिवारची सकाळ काळरात्र ठरली. आंबेनळी घाटात सकाळी साडेदहाला एका वळणावर बस सुमारे पाचशे फूट दरीत कोसळली. यात एका अधिकाऱ्याचा अपवाद वगळता, चालकासह बसमधील सर्व ३३ कर्मचारी जागीच ठार झाले.

  पावसाची संततधार धुके, निसरडे रस्ते आणि खोल दरीत उतरण्यास येणाऱ्या अडचणींमुळे मदतकार्यातही अडथळे येत असले तरी दोर लावून ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे आणि वर आणण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. त्यानंतर मृतदेह पोलादपूर रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती कळताच रत्नागिरी तसेच विद्यापीठ परिसरावर शोककळा पसरली. अपघातामुळे परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
  दरम्यान, या भीषण अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव प्रवासी बचावले आहेत. बस दरीत कोसळण्यापूर्वी दरवाजाजवळ बसलेले प्रकाश दरवाजा तुटून बाहेर फेकले गेले आणि दहा-पंधरा फूट घसरत गेले. भानावर आल्यावर त्यांनीच या अपघाताची माहिती विद्यापीठाला तसेच पोलिसांना कळवली. त्यानंतर लगेच पोलिस, ट्रेकर्स यांनी मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे पोलादपूर परिसर आणि आंबेनळी घाटातील वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली असून, घाटात वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.


  अपघातग्रस्त बसचा पूर्णत चेंदामेंदा झाला असून फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. दरीच्या उतरत्या बाजूंवर ठिकठिकाणी दुर्दैवी प्रवाशांचे मृतदेह पडले होते. अनेक देह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होते. बसमधील सामान, प्रवाशांच्या चपला, बूट, सामान अस्ताव्यस्त विखुरले होते. कोसळणारा पाऊस, दाटलेले धुके, सर्वत्र झालेला चिखल आणि बघ्यांची प्रचंड गर्दी अशा अवस्थेत दोरखंड लावून मृतदेह वर काढण्याचे काम बचाव पथके करत होती. परिसरातील सर्व रुग्णवाहिका रस्त्यावर सिद्ध ठेवण्यात आल्या होत्या. पोलादपूर रुग्णालयात शवविच्छेदनाची व्यवस्था करण्यात आली होती. सोबत मृतदेहांची ओळख पटवण्याचे कामही सुरू होते. ओळख पटताच संबंधितांच्या नातेवाइकांकडे ते सुपूर्द केले जात होते. त्यांचा आक्रोश हेलावून टाकणारा होता, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.


  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ कर्मचारी शनिवारी सकाळी साडेसहा वाजता महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. प्राध्यापक, विद्यार्थी आणि काही क्लेरिकल स्टाफ यांचा त्यात समावेश होता. बसमध्ये एकही महिला नव्हती, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठातील कृषी अधिकारी संजय भावे यांनी दिली.

  अपघातातील मृतांची नावे
  राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिवगण, संतोष जळगावकर, शिवदास आगरे, सचिन गिव्हणेकर, राजेंद्र रिसबूड, सुनील साठले, रितेश जाधव, पंकज कदम, नीलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रविकिरण साळवी, संजीव झगडे, सुयश बाळ, जयंत चौगुले, किशोर चौगुले.

  दोघे आयत्या वेळी आले नाहीत म्हणून वाचले
  दरवर्षी या सहलीला आवर्जून जाणारे दोन जण या अपघातातील बळी ठरण्यातून बचावले. ऋतुज कदम हे सहलीला जाणार होते. पण आयत्या वेळी त्यांच्या गरोदर पत्नीने त्यांना जाण्यापासून परावृत्त केले आणि तिचा आग्रह मानून ऋतुज घरीच थांबले, तर दुसरे कर्मचारी संजय सावंत यांना ताप आल्याने ते सहलीला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ते यातून बचावले.

  दुर्दैवी रोशन…
  या अपघातात मृत्युमुखी पडलेला रोशन तबीब हा युवक अवघ्या २८ वर्षांचा होता. तो हर्णै येथील रहिवासी असून कृषी विद्यापीठात कामाला होता. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी रोशनचा विवाह झाला होता. बसमधील थट्टामस्करीचा, आनंदाचा शेवट त्याच्या मृत्यूत व्हावा, ही दुर्दैवी घटना होती.

  एनडीआरएफचे पथक दाखल : अपघातग्रस्त बस ६०० फूट खोल कोसळल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफचे बचाव पथक, पोलिस आणि ट्रेकर्स व स्वयंसेवक यांची मोठी टीम मदतकार्यात गुंतली आहे. दोरखंड सोडून मृतदेह वर काढण्याचे काम सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ११ मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आल्याचे चंद्रसेन पवार, प्रदीप लोकरे, प्रदीप कुडाळ या तहसीलदारांनी सांगितले.

  पंतप्रधान, राष्ट्रपती, राहुल गांधींकडून श्रद्धांजली : या अपघाताची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

  दैव बलवत्तर होतं,अन्यथा मीही गेलो असतो : सावंत
  या अपघातात बचावलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंत देसाई म्हणाले, बस दरीच्या दिशेने घसरत असताना बसचे दार उघडले गेले आणि मी बाहेर फेकला गेलो. दहा-पंधरा फूट घसरल्यावर एका झाडाला अडकलो. धुक्यामुळे नेमके काहीच समजत नव्हते. कसाबसा उठून वर येण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी अर्ध्या-पाऊण तासानंतर मला रस्ता मिळाला. मी रस्त्यावर आलो आणि नेमके काय घडले असावे, याची मला कल्पना आली. सुदैवाने माझा मोबाइल व्यवस्थित होता, पण रेंज नव्हती. ती मिळाल्यावर मी त्वरित विद्यापीठात फोन करून घडल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर मदतकार्य सुरू झाले. केवळ माझे दैव बलवत्तर होते, अन्यथा मीही गेलो असतो, असे सावंत म्हणाले. ते विद्यापीठात सहायक अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.

  पंतप्रधान, राष्ट्रपती, राहुल गांधींकडून श्रद्धांजली : या अपघाताची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे भीषण फोटोज...

 • 33 Died in Bus collapsed in 500 feet deep in Poladpur valley
 • 33 Died in Bus collapsed in 500 feet deep in Poladpur valley

Trending