आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉ.गोविंद पानसरे यांचे मारेकरी मोकाट... सर्व स्तरावर सरकार अपयशी, भाकपचा निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्या होऊन तब्बल 38 महिने उलटले आहेत. तरीही आरोपी तपास यंत्रणांच्या हाती लागत नाही. सीबीआयसारखी यंत्रणासुद्धा कुचकामी ठरली आहे. गौरी लंकेश, डॉ.दाभोळकर, डॉ,कलबुर्गी यांच्याही हत्त्येतील सूत्रधारासह मारेकरी अद्याप मोकाट आहेत. याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) कोल्हापुरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पानसरे, दाभोळकर यांच्या हत्त्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांवर सरकारच दबाव टाकत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

 


सीबीआय सारख्या सक्षम तपासी यंत्रणेने कॉ.गोविंदराव पानसरे, डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी सापडत नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अशा तपास यंत्रणांना चांगलेच फटकारले. राज्यातल्या विचारवंतांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांची भूमिका संशयास्पद असून सरकारच या तपास यंत्रणांवर दबाव टाकत आहे. त्याचबरोबर

'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकारने गोरगरीब जनतेत जातीयवादी भांडणे लावण्याचे काम केले. जनतेविरुद्ध चाललेल्या लुटारू भांडवलशाहीच्या षड्यंत्राकडे लक्ष जाऊ नये, याची सोय केली. गेल्या 3 वर्षांत भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. स्वामिनाथन आयोगाच्या मागण्यांना अडगळीत टाकण्यात आले. शेतकऱ्यांना हमीभावापासून दूर ठेवले. कर्जमाफीकडेही दुर्लक्ष केले. नोटाबंदीच्या निर्नायाने बँकिंग क्षेत्र मोडीत काढण्यात आले. देशात बेरोजगारी वाढली. शिक्षणाचे खासगीकरण करण्याचे काम बेमालूमपणे हे केंद्र सरकार करत आहे. सर्वसामान्यांचे सर्वप्रकारे केल्या जाणाऱ्या शोषणाविरोधात काम करणारे कार्यकर्ते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, डॉ.एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करणाऱ्या धर्मांध संघटनाच्या कृत्यावर या सरकारने पांघरूण घातले आहे. असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

 

सरकारने आधी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. राज्यघटनेचे स्मरण ठेवून काम करावे, शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देऊन स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व कर्जमाफी, पेन्शन विनाअट द्यावी. कामगारांना किमान वेतन 18 हजार करून प्रत्येकास पेन्शन व सामाजिक सुरक्षा द्यावी. तसेच कामगार कायद्यातील भांडवलदारांच्या बाजूचे बदल त्वरित मागे घ्यावेत. अंगणवाडी, बांधकाम कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर्स याच्या मागण्या मान्य कराव्यात. शिक्षणाचे खासगीकरण व धार्मिकीकरण रद्द करून 1314 शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा,कार्पोरेट कंपन्यांना शाळा चालविण्यास देऊ नये व संपूर्ण स्वयं अर्थसहाय्यित शाळा कायदाच रद्द करावा.शिक्षणावर एकूण उत्पादनाच्या 6 टक्के खर्च करावा. सरकारी विभागातील 1 लाख 77 हजार पदे त्वरित भरावीत. केंद्र सरकारची 4 लाख 20 हजार पदे रद्द करू नयेत. 23 हजार शिक्षक भरती, 9 हजार प्राध्यापक भरती करून बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्यावा. मनरेगामध्ये रोजगार करणाऱ्यांना किमान वेतन प्रतिदिन 500 रु. द्यावे. महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्यावरील वाढते अत्याचार पूर्णपणे थांबवावेत, महिलांच्या घरगुती हिंसाचार विरोधी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी करून कौटुंबिक सल्ला केंद्रे जागोजागी स्थापावीत व संपूर्ण दारूबंदी करावी या ही मागण्या निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

टाऊन हॉल उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतरमोर्चाचे सभेत रूपांतर झाले.यावेळी नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, उमा पानसरे, दत्ता मोरे, बी. एल. बरगे, गिरीश फोंडे, दिनकर सूर्यवंशी, सम्राट मोरे, अनिल चव्हाण, स्वाती क्षीरसागर, हणमंता लोहार, रघुनाथ कांबळे, नामदेव पाटील, सुनंदा खाडे, सुमन पाटील आदी उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... भाकपने काढलेल्या विराट निषेध मोर्चाचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...