आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरप्रमाणे अाता काेल्हापूरच्या मंदिरातही सर्वजातीय पगारी पुजारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर - पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराप्रमाणेच अाता काेल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातही सर्व जातींतून पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. त्यासाठी मंगळवारपासून मुलाखतीही हाेणार अाहेत. या नियुक्तीत विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद देवस्थानने केली अाहे. मात्र, एकाही विद्यमान पुजाऱ्याने त्यासाठी अर्ज केलेला नाही, हे विशेष.  


श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला घागरा-चाेळी नेसवण्याच्या प्रकारानंतर काेल्हापुरात पारंपरिक पुजाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी अांदाेलन झाले हाेते. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले. अखेर राज्याच्या विधी व न्याय खात्याने देवस्थान समितीलाच स्वतंत्र समिती स्थापन करून पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगितले. त्यानुसार समितीकडे आजवर सहा महिलांसह ११७ जणांचे अर्ज अाले अाहेत. त्यांच्या मुलाखती १९ जूनपासून सुरू हाेणार अाहेत.  

 

मंदिरात ११ प्रमुख पुजारी व ३५ सहायक पुजारी अशा एकूण ५५ पुजारी व सेवेकऱ्यांची आवश्यकता अाहे. धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधी यांची समिती या पुजाऱ्यांची निवड करेल.   


निवड झाल्यानंतर देणार प्रशिक्षण 

महालक्ष्मीच्या  धार्मिक विधींचे ज्ञान असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे सामाजिक जीवन, वर्तणूक, वयोमर्यादा, पावित्र्याचे पालन याची माहिती घेण्यात येणार आहे. या निकषाला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी न्याय विधी विभागाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. 


किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन दिले जाईल. निवड झालेल्या पुजाऱ्यांना देवीच्या धार्मिक विधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंबाबाईची नित्यपूजा, मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, उत्सव काळातील पूजा, काकड आरती ते शेज आरतीपर्यंतचे विधी शिकवले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...