आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर-राजकीय वर्चस्वाच्या वादातून दोघांची हत्या, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) खून का बदला खून पद्धतीने राजकीय वर्चस्वाच्या वादातून झालेल्या अशोक पाटील व धनाजी गाडगीळ या दोघांच्या खुनांच्या गुन्ह्यांचे निकाल आज एकाच दिवशी जाहीर झाले. दोन्ही खटल्यातील एकूण 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी.बिले यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली. निकालाच्यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकालावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून ही गर्दी पांगवली. दरम्यान पाचगावमध्येही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

कोर्टाने अशोक मारुती पाटील (रा.पाचगाव) यांच्या खून प्रकरणी दिलीप अशोक जाधव उर्फ डी.जे,अमोल अशोक जाधव, हरिष बाबूराव पाटील, ओंकार विद्याधर सुर्यवंशी, महादेव उर्फ हेमंत म्हसगोंडा कलगुटकी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तर तीन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील विवेक शुल्क यांनी सांगितले. पाटील यांचा 13 फेब्रुवारी 2013 रोजी हा खून झाला होता. त्यांचा मुलगा मिलिंद पाटील याने फिर्याद दिली होती. 

 

अशोक पाटील यांच्या खुनाचा बदला म्हणून धनाजी तानाजी गाडगीळ (रा.पाचगाव) याचा 23 डिसेंबर 2013 रोजी खून करण्यात आला होता या खून प्रकरणी मिलिंद अशोक पाटील, महेश अशोक पाटील, अक्षय जयसिंग कोंडेकर, निशांत नंदकुमार माने, प्रमोद कृष्णात शिंदे, गणेश कलगुटकी यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा , प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सरकारी वकील श्रीकांत जाधव (सांगली) यांचे सहाय्यक विश्‍वजित घोरपडे यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...