आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर प्राधिकरण हद्दीतील जमिनी नगररचना योजनेच्या माध्यमातून ताब्यात घ्यावात- पालकमंत्री पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील जमिनींचे सुनियोजन करून 42 गावांच्या सर्वांगिण विकासाचे प्रकल्प हाती घेऊन नगर रचना योजनेच्या माध्यमातून जमीन ताब्यात घ्यावात. तसेच नागरीकांचे जीवनमान उंचाविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.


महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचनेनुसार कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र घोषित केले असून  या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची पाहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह समितीचे पदसिध्द सदस्य प्रदीप झांबरे, रेश्मा सनदी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्राधिकरणातील 42 गावांचा सुनियोजित विकास साधण्यासाठी अधिनियमाच्या तरतूदीनुसार उपाययोजना प्राधान्याने करण्याची सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्राधिकरण हद्दीतील जमिनींचा योग्य प्रकारे विकास पुर्ण करून, विकास झाल्यावर प्रदेशातील सर्व नागरीकांचे जीवनमान उंचावून जीवनशैलीमध्ये सुधारणा होऊन सर्वांगिण विकास होईल. जेणेकरून अंतिमत: प्रत्येक नागरीकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल.
 
 
आजच्या पहिल्या बैठकीमध्ये 10 विषय चर्चेला घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने  प्राधिकरणाच्या सदस्यांना प्राधिकरणाच्या कामकाजाची व अधिकाराची माहिती देणे. सुनियोजित विकास साधण्यासाठी अधिनियमाच्या तरतूदीनुसार करावयाच्या उपाययोजनासंदर्भात चर्चा, नगर रचना योजनेच्या माध्यमातून जमीन ताब्यात घेणे. सन 2017-18 व सन 2018-19 साठी विशेष सहायक अनुदान मागणी, प्राधिकरणासाठी आवश्यक कर्मचारी नेमणूकी संदर्भात आकृतीबंध प्रस्ताव शासनास सादर करणे, सभेसाठी प्रारूप नियमावली इ. बाबींचा समावेश होता. प्राधिकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय इमारतीमध्ये 1300 चौ. फु. जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 9 फेब्रुवारी 2018 पासून शिवराज पाटील यांनी सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा  कार्यभार स्विकारला असून प्राधिकरणाच्या कामकाजास सुरवात झालेली आहे. कार्यालयीन कामकाजासाठी नगर रचना संचालनालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शासन अधिासूचनेनुसार प्राधिकरणाकडे पदभरती होईपर्यंत सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर यांचे तांत्रिक अभिप्राय / सल्ल्याने कामकाज करण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज पाटील यांनी सांगितले.


विकासशूल्क/अधिमूल्य/प्रशमन शुल्क इ. भरून घेण्यासाठी राष्ट्रियकृत बँकेत प्राधिकरणाचे नावाने खाते उघडण्यात येत आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कामकाजास गतीने सुरवात होईल. यानुसार प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना पायाभुत सोईसुविधा उपलब्ध होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या बैठकीत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणासंदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.