आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्थाने हाणून पाडावी लागतील; राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- बाळासाहेब विखे यांनी केलेल्या वैचारिक संघर्षामुळे प्रवरा परिसर उभा राहिला. त्यांच्या विकासाच्या विचाराला समृद्ध करतानाच भूमिकेशी प्रामाणिक राहूनच भविष्यातील सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षास कटिबद्ध व्हावे लागेल. येणाऱ्या काळात राजकीय, सामाजिक आव्हाने मोठी असली, तरी विकासाच्या प्रक्रियेत आपण कोठेही मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच या विकासाच्या कामाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्थान संघटितपणे हाणून पाडावी लागतील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. 


विरोधी पक्षनेते विखे यांच्या ५९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवरा परिवारातर्फे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषदे अध्यक्ष शालिनी विखे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, चेअरमन डॉ. सुजय विखे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नवी मुंबईचे उपमहापौर म्हात्रे, सभापती हिराबाई कातोरे, अंबादास पिसाळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर, सचिन गुजर, शिवाजीराव गाडे, बापूसाहेब गुळवे आदिक याप्रसंगी उपस्थित होते. 


सत्काराला उत्तर देताना विखे म्हणाले, २०१४ मध्ये शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या प्रचंड मताधिक्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात काम करताना शरमेने मान खाली जाईल, असे कोणतेही चुकीचे काम आपल्या हातून झालेले नाही. मतदारसंघातील सामान्य माणसाला अभिमान वाटेल असेच काम आपण करत आहोत. खासदार साहेबांनी जो विचारांचा वारसा दिला त्यालाच आपण प्ररेणा मानून काम करत राहिलो. 


विकासाच्या कामाची सुरुवात विचारांची बांधिलकी मानून खासदार साहेबांनी सुरू केली. विकासाचे बिजारोपण त्यांनी केले. त्यामागे मोठा दृष्टिकोन होता. आज प्रवरा शिक्षण संकुलातून ९४ हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. हेच विद्यार्थी आता जगात विविध ठिकाणी काम करताना प्रवरेचा अभिमानाने उल्लेख करतात. त्यावेळी खऱ्या अर्थाने खासदार साहेबांच्या कार्याची ताकद कळते. हेच काम आता भविष्यातही व्यापकतेने पुढे न्यावे लागेल. भविष्यात बाहेरील देशांशी शैक्षणिक करार आणि रोजगारांच्या संधीबाबत प्रवरा शैक्षणिक संकुलातून कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. 


राज्यातील समाज घटकांना न्याय देताना मतदारसंघातील विकासात मात्र कुठेही कमी पडलेलो नाही. लोककल्याणकारी योजनांच्या पाठपुराव्यात आपला मतदारसंघ राज्यात अव्वल आहे. विकासाच्या या प्रक्रियेला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचे कारस्थान सुरू झाली आहेत. या पाठीमागे कोणत्या शक्ती आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. पण याचा विचार न करता ही विकासाची प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 
युवानेते डॉ. सुजय विखे यांनी प्रास्ताविकात विखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून आपण साजरा करत असतो. मोफत अपघात विमा योजना, जलक्रांती योजना असे उपक्रम शिर्डी मतदारसंघात आपण यशस्वी केले. या वाढदिवसानिमित्त शिर्डी मतदारसंघात पुढील एक वर्षात प्रत्येक घरात रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आपण हाती घेणार आहोत. त्याची सुरुवात लगेचच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न 
मागील २५ वर्षांच्या िनळवंडे कालव्याच्या प्रश्नाच्या संघर्षात खासदार साहेबांना बदनाम करण्याचा आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र या कामाच्या श्रेयवादाच्या लढाया सुरु झाल्या आहेत. आमची भुमिका स्पष्ट आहे. पुढील २ वर्षांत जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठीच विरोधी पक्षनेता म्हणून आपला प्रयत्न राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...