आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party Talking To Raju Shetty, Waman Chatap For The Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकीसाठी ‘आम आदमी’ची राजू शेट्टी, वामन चटप यांच्याशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘भ्रष्टाचार, शासकीय बेपर्वाई आणि राजकीय मुजोरीमुळे राज्यातील सामान्य माणूस अस्वस्थ झाला आहे. दिल्लीतील ‘आप’च्या विजयामुळे त्याला आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रातही बहुतांश ठिकाणी ‘आप’चे उमेदवार उभे केले जातील,’ अशी घोषणा आम आदमी पार्टीच्या राष्‍ट्रीय समितीचे सदस्य सुभाष वारे यांनी सोमवारी केली. त्यासाठी राजू शेट्टी यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातारा येथील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व अजित पवार यांचे समर्थक राजेंद्र चोरगे यांनी सोमवारी वारे यांच्या उपस्थितीत ‘आप’मध्ये प्रवेश केला. या वेळी वारे म्हणाले की, कोकणात तीन राणे, मराठवाड्यात तीन मुंडे, नाशकात तीन भुजबळ, सोलापुरात तीन मोहिते, मुंबईत तीन ठाकरे हीच समीकरणे आपण आजवर पाहिली. सगळे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्या राजकारणाचा आता सर्वांनाच कंटाळा आला आहे. सामान्य माणूसही निवडणुकीत उभा राहू शकतो, मंत्री बनू शकतो हे आता सर्वांनी दिल्लीत पाहिले आहे.
चांगल्या संघटनांची सोबत
आगामी निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच शेतकरी संघटनांशी बोलणी सुरू आहे. वामनराव चटप, राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे. शरद जोशी यांच्याशी बोलणी करू. चांगले काम करणा-या संघटनांना आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत. आम्हाला राजकारण करायचे नाही तर यंत्रणा बदलायची आहे, असे वारे म्हणाले.
पैशांचा जोर चालणार नाही
आम आदमी पार्टीमुळे इतर पक्षही प्रामाणिकपणाचा विचार करायला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच बंगल्याच्या सजावटीसाठी स्वत:च्या खिशातून रक्कम मोजली, हा त्याचाच एक भाग आहे. आता इतर राजकीय पक्षांनाही त्यांच्या संघटनेत असलेल्या चांगल्या माणसांनाच समोर आणावे लागेल, केवळ पैशांच्या जोरावर राजकारण करता येणार नसल्याचेही वारे यांनी या वेळी स्पष्ट केले.
राजू शेट्टींकडूनही युतीचे संकेत
आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला उखडून टाकण्यासाठी जे बरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, असे स्पष्ट करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही सोमवारी ‘आप’शी युती करण्याचे संकेत दिले.
‘आप’शी युती करण्याची आमची तयारी आहे. मात्र त्यांनी आधी त्यांची धोरणे जाहीर करावीत. ‘आप’ शहरी लोकांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे तर आमची संघटना शेतक-यांसाठी लढते. आमचा ‘एफडीआय’ला पाठिंबा आहे तर केजरीवाल यांचा विरोध आहे. काही मुद्द्यांवर आमचे एकमतही आहे. जनलोकपालला आम्ही पाठिंबा दिला होता, तसेच अण्णांनी ऊस आंदोलन व साखर सम्राटांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. येत्या काही दिवसात आपण अरविंद केजरीवाल व योगेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत राष्‍ट्रवादीचा सुपडा साफ
कृष्णा खो-याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून राष्‍ट्रवादी काँग्रेसने आपली कंबर खोदली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनता राष्‍ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ करील, असे भाकीत आम आदमी पार्टीचे नेते, जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी विजय पांढरे यांनी सोमवारी केले.
‘आप’च्या मेळाव्यासाठी कोल्हापुरात आले असता पांढरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाटबंधारे प्रकल्पांच्या कामामध्ये युतीच्या काळात अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार करून उच्छाद मांडला होता. तीच भूमिका आता राष्‍ट्रवादी काँग्रेस पार पाडत आहे. सरकार भ्रष्ट मंत्री, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचा-यांना पाठीशी घालत असल्यानेच हे घोटाळे वाढत चालल्याचा आरोपही पांढरे यांनी केला.
चितळेंकडून अपेक्षा नाहीत : डॉ. माधवराव चितळे यांची आतापर्यंतची कामाची पद्धत पाहता ते सिंचन घोटाळ्यातील मूळ शोधून राज्यकर्त्यांची लबाडी उघडकीस आणण्याची शक्यता कमीच आहे. जलसंपदाच्या अधिका-यांवरच या गैरव्यवहाराचे खापर फुटेल, अशी भीतीही पांढरे यांनी व्यक्त केली.