आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यासाेबत मीही श्रमदान करू इच्छिताे, अभिनेता अामिर खानची साताऱ्यात भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - प्रशासनाला बरोबर घेऊन दुष्काळी भागामध्ये जलसंधारणाची क्रांतिकारी कामे करण्याची आकांक्षा अभिनेता आमिर खान याने रविवारी व्यक्त केली. ‘आपल्याबरोबर मीही श्रमदान करू इच्छितो,’ असे सांगतानाच सातारा येथील कोरेगावसह अमरावती व बीड जिल्ह्यांत कायमस्वरूपी जलसंधारणाची कामे करणार असल्याचे अामिरने सांगितले.
दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने अामिर खान व त्याच्या इतर काही सहकाऱ्यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली अाहे. त्या अंतर्गत ‘वॉटरकप’ स्पर्धेसाठी त्याने काही गावांची निवड केली अाहे. सातारा जिल्ह्यातील गावांतील अडचणीची माहिती घेण्यासाठी अामिर व जिल्हाधिकारी अश्विन मुद‌्गलयांच्या उपस्थितीत रविवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात अाली.

या वेळी आमिर खानने आपल्या संकल्पनेची माहिती दिली. तसेच कोरेगाव येथील चाललेल्या कामाची माहिती घेतली. आमिर ‘लोकांनी पाणी बचत व संवर्धन करणे आवश्यक आहे. जलसाक्षरता निर्माण व्हावी यासाठी राज्यभर प्रबोधनाचे कामही आम्ही करणार आहोत. हे काम केवळ आम्हीच करणार नसून प्रशासनाचे मार्गदर्शन, मदत व सहकार्यही घेणार अाहाेत. जलसाक्षरतेची चळवळ गावोगावी पोहोचविणार असून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेणार आहोत. केवळ आर्थिक पाठबळ देणे हा आमचा उद्देश नसून मी स्वत: येथे श्रमदान करण्यास उत्सुक आहे. सध्या आम्ही अमरावती, बीड व सातारा या जिल्ह्यांमध्ये काम करीत आहोत. हे तीन जिल्हे यावर्षीचे आमचे उद्दिष्ट आहे. परंतु पुढील वर्षी राज्यातील ३० तालुक्यांमध्ये आम्ही जलसंधारणाची कामे आणि प्रबोधन करणार आहाेत,’ असा मानसही अामिरने व्यक्त केला.
‘दुष्काळी भाग काही शूटिंगचा स्पाॅट नाही’
विराेधी पक्षाच्या अामदारांनी मात्र अमिर खानने घेतलेल्या प्रशासकीय बैठकीवर तीव्र टीका केली अाहे. ‘अामिरला घेऊन दुष्काळ मिटत असेल तर मिटवा, पण किमान लाेकप्रतिनिधींना तरी कळवा,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अामदार शशिकांत शिंदे यांनी केली. तर ‘सरकार, प्रशासन सेलिब्रिटींच्या ताटाखालचे मांजर झाले अाहे,’ अशी टीका काॅंग्रेसचे अामदार जयकुमार गाेरे यांनी केली. ‘हे लाेक एक दिवस येऊन काैतुक करुन घेणार. हिंमत असेल तर राेजगार हमी याेजना राबवावी. दुष्काळी भाग काय तुमचा शूटिंगचा स्पाॅट नाही. बाेगस समाजसेवकांचे चाेचले थांबवावेत. या बैठकीबाबत जाब विचारु,’ असा इशाराही गाेरे यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...