आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Challenge To Satara Royal Family, Pawar Supporter Rajendra Chorge Entered In Kejriwal Party

साता-यातील राजेशाहीला ‘आप’चे आव्हान, अजित पवार समर्थक राजेंद्र चोरगे केजरीवालांच्या पक्षात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकणा-या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर महाराष्‍ट्रातील अनेकांचा ओढा या पक्षाकडे लागला आहे. साता-यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राजेंद्र चोरगे यांनी ‘आप’मध्ये प्रवेश करत साता-यातील ‘राजेशाही’ला आव्हान दिले आहे.
चोरगे यांनी पंधरा वर्षांपूर्वी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून शहरातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सुरू केले होते. साता-यातील राष्‍ट्रवादीचे खासदार व छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्याविरोधात त्यांनी मोहीम उघडली होती. हे करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मात्र चोरगे यांनी जवळीक साधली होती.
गेल्या काही दिवसांपासून सातारा नगरपालिकेच्या कारभारावर टीका करतानाच चोरगे यांनी आमदार भोसले यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे शिवेंद्रसिंह भोसले यांनी ‘समाजकारणाच्या बुरख्यात न राहता राजकारणात येऊन दाखवा’ असे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत आपण आम आदमी पक्षात प्रवेश करत असल्याचे चोरगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सोमवारी ‘आप’चे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पांढरे, सुभाष वारे यांच्या उपस्थितीत चोरगे व बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारीही आप’मध्ये ‘अधिकृत प्रवेश करणार आहेत.
पत्रकारांशी बोलताना चोरगे म्हणाले की, ‘आमचा हा लढा विचारांचा आहे. लोकशाहीविरुद्ध राजेशाही असा आहे. सामान्य माणूस यापुढे दबून राहणार नाही. दिल्लीत जे घडले ते साता-यातही घडू शकते,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.