Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Aap Workers Beaten In Municipal Office

महापौर दालनातच मेयरच्या पुत्राचा राडा, निवेदन घेऊन गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण

प्रतिनिधी | Jun 19, 2017, 21:45 PM IST

  • महापौर दालनातच मेयरच्या पुत्राचा राडा, निवेदन घेऊन गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांना मारहाण
कोल्हापूर- महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणारा रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव रद्द करावा, या मागणीचे निवेदन महापौरांना देण्यासाठी गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांना महापौरांच्या दालनातच महापौर पुत्राकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून पालिकेतील सीसी टीव्ही फुटेज पाहून आयुक्तांनी या मारहाणीची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महामार्गाजवळील पाचशे मीटर क्षेत्रातील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे कोल्हापूर शहरातील ८९ मद्यांची दुकाने, हॉटेल, परमीट रूम बंद झाले आहेत. कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने अनेक व्यावसायिक हतबल झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाला दारूवरील एलबीटीचे उत्पन्नही निम्म्याने कमी झाले. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी मद्यविक्रेते आणि महानगरपालिकेतील काही नगरसेवकांच्या मदतीने राज्य व राष्ट्रीय महामार्ग महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मद्य व्यवसायिकांच्या हिताचा प्रश्न समोर ठेवून रस्ते हस्तांतरण करण्याचा सदस्य ठराव पालिका सभागृहासमोर मांडण्याचा निर्णय कारभारी नगरसेवकांनी घेतला. यामध्ये खूप मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्या असल्याची चर्चा मनपा परिसरात रंगू लागली. तेरी भी चूप और मेरी भी चूप प्रमाणे कोणीच काही बोलायला तयार नव्हते.

आज दुपारी आम आदमी पार्टी पक्षाचे काही कार्यकर्ते रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव सभेमध्ये रद्द करावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी महापौर कार्यालयात गेले होते. शनिवारी त्यासाठी वेळ घेण्यात आली होती. मात्र, तरीही महापौर एका रुग्णाला भेटायला खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर महापौरांनी आपच्या कार्यकर्त्याना यायला एक तास लागेल असे कळवले. आपचे कार्यकर्ते त्यांच्याच दालनात वाट बघत बसले.
इतक्यात महापौर पुत्र आणि माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास हे महापौर दालनात आले. त्यांनी रस्ते हस्तांतरण विषयावरून आणि आपच्या निवेदनावरून आपच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढू लागल्याने संदीप देसाई या आपच्या माजी पदाधिकाऱ्याने महापौर पुत्रास तुम्ही कोण आम्हास विचारणार? आम्ही महापौरांना भेटायला आलोय असे सांगितले. त्यावरून चिडलेल्या महापौर पुत्राने (आदिल फरास) आपल्या मनपा बाहेर उभारलेल्या समर्थकांना आणि आघाडीच्या नगरसेवकांना महापौर दालनात बोलावून घेत संदीप देसाईची गळपट्टी धरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचे मोबाईलवर चित्रिकरण करणाऱ्या उत्तम पाटील या कार्यकर्त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत त्यातील सर्व छायाचित्रण आणि छायाचित्रे सुद्धा पुसून टाकली. या घटनेचा निषेध करून मनपा पदाधिकाऱ्याना आपले निवेदन देवून आपचे कार्यकर्ते तेथून निघून गेले.

यावेळी आपचे पश्चिम माजी संयोजक नारायण पोवार, माजी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, संदीप देसाई, अप्पासाहेब कोकितकर, उत्तम पाटील, विश्वनाथ शेट्टी, सुरेश पाटील, नाथाजी पोवार, आनंदा वानिरे आणि श्रीमती इस्तेर कांबळे या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

दरम्यान सायंकाळी ६ वाजता आपच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेवून महापौर पुत्राकडून झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध केला आणि महापौर कक्षातील आणि मनपाच्या आवारातील सीसी टीव्ही फुटेज पाहून आयुक्तांनी झाल्या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली.

Next Article

Recommended