आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abdul Kalam Inaugurates Symbiosis School In Kolhapur District

कोल्हापुरातील हरळीमध्ये कलाम सरांचा तास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- समोर बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना व्यासपीठावरून एक शिक्षक गे्रट होण्यासाठी टिप्स देत होता. हे विद्यार्थी अतिशय तन्मयतेने त्या शिक्षकाचा शब्दन्शब्द कानात साठवत होते आणि केवळ तासाभराच्या त्याच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि उपस्थित सर्वजण कृतकृत्य झाले. हे शिक्षक होते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांनी हा तास घेतला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील 2000 वस्तीच्या हरळी या गावी.
पुणे येथील सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे हरळी हे मूळ गाव आहे. त्यांच्या या गावी उभारण्यात आलेल्या सिंबायोसिस स्कूलचे उद्घाटन डॉ. कलाम यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या वेळी त्यांनी औपचारिकता बाजूला ठेवून प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हा दिवस अविस्मरणीय असून सिंबायोसिस स्कूलच्या उदघाटनाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांची उपस्थिती सर्वांना प्रेरणा देणारी ठरल्याचे डॉ. मुजुमदार यांनी प्रास्ताविकात सांगितले. त्यांच्या हस्ते डॉ. कलाम यांचा गजराजाची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला.
भारतातील उच्च शिक्षणामध्ये सिंबायोसिसचे योगदान मोलाचे असून आता ग्रामीण भागाच्या सबलीकरणासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. अनंत अडचणींवर मात करत डॉ. मुजुमदार यांनी हे संकुल उभारल्याचे गौरवोद्गार या वेळी डॉ. कलाम यांनी काढले. आपल्या शाळेतील सर्वसाधारण बुद्धीच्या विद्यार्थ्यालाही उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन या वेळी डॉ.कलाम यांनी केले. आपल्या रामेश्वर या गावातील शाळेतील शिक्षकांच्या आठवणी सांगत कलाम यांनी ‘आय विल फ्लाय’ असा आशय असलेली शपथ विद्यार्थ्यांना दिली.
ज्ञान, आत्मविश्वास, आंतरिक सौंदर्य, परिश्रम, धैर्य, संकटावर मात करण्याची वृत्ती अंगामध्ये राबवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याची सूत्रेच डॉ. कलाम यांनी सांगितली. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नेमकी उत्तरे देत डॉ. कलाम यांनी मंडपालाच क्लासरूमचे स्वरूप दिले. 1 लिटर पेट्रोल वापरल्यानंतर 2 किलोगॅ्रम कार्बन डॉयआॅक्साइड निर्माण होतो असे सांगत त्यांनी हरळीच्या 1000 ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी येत्या पाच वर्षांत प्रत्येकी 10 झाडे लावावीत, असे आवाहन केले.