आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Acharya Kool Will Set Up At Each District, Ramdev Baba's Educational Project

प्रत्येक जिल्ह्यात आचार्य कुल, शिक्षणाच्या स्वदेशीकरणासाठी योगगुरू रामदेवबाबा यांचा उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - महात्मा गांधींपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकांनी शिक्षणाच्या स्वदेशीकरणाची मागणी केली होती. त्याचसाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात २ ते ५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल, अशी आचार्य कुले उभारणार असल्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचा दावा त्यांनी केला.

योग, आयुर्वेद, वैदिक परंपरा, संस्कृती यासाठी काम केल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणून शिक्षणाकडे लक्ष देणार असून या कामाला यापुढे प्राधान्य देणार असल्याचे रामदेव यांनी सांगितले. आगामी २० वर्षांनंतर या देशाची सूत्रे उत्तम नेतृत्वाकडे जावीत यासाठीच आम्ही आतापासून कामाला लागलो आहोत.

भारत देशाला मोठं करणारं नेतृत्व आचार्य कुलातून घडवू, असेही त्यांनी सांगितले. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वातंत्र मिळाले नाही हे वास्तव आहे. म्हणूनच उच्च गुणवत्ता, रास्त किंमत आणि कमाई समाजासाठी या त्रिसूत्रीवर आधारित उद्योग उभारण्याचीही तयारी आपण सुरू केली आहे. सबसिडीची शिडी न घेता स्वदेशी उत्पादनाला महत्त्व देणार असल्याचेही रामदेव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली १७७ देशांनी योगदिनाला मान्यता दिली आहे. त्या दिवशी कोट्यवधी भारतीयांना आम्ही योगासाठी प्राेत्साहित करणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी पतंजलीचे कोल्हापूरचे प्रमुख सन्मति मिरजे, प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तर माझा ‘अण्णा’ होईल
मोदी यांनी काळा पैसा देशात आणण्यापासून जी अनेक आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी त्यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे. उठसूट जर मी सरकारवर टीका करायला लागलो तर माझी अवस्था अण्णांजींसारखी होईल, असा टोला रामदेव बाबांनी लगावला.

मंदिराजवळ स्वच्छता
मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेचा एक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सर्वत्र मी स्वच्छतेचा संदेश देत असतो, असे सांगत रामदेवबाबा यांनी महालक्ष्मी मंदिरानजीक स्वच्छता केली. खासदार धनंजय महाडिक, महापौर तृप्ती माळवी आदी उपस्थित होते.

असे असेल आचार्य कुल
*प्रत्येक जिल्ह्यात २००० ते ५००० विद्यार्थ्यांना शिक्षण
*स्वतंत्र अभ्यासक्रम आणि मंडळ
*५ ते १० एकरांमध्ये संस्था
*१००० पेक्षा जास्त दानशूर संस्थेला जागा देण्यास तयार
*वर्षभरात १०० पेक्षा अधिक ठिकाणी उभारणीला सुरुवात
*पाच वर्षांत काही प्रकल्प पूर्ण करण्याचे नियाेजन
*सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अध्यापन
*गरिबांच्या मुलालाही प्रवेश घेता यावा इतकी कमी फी
*पतंजलीसह वेदांत समूह, राहुल बजाज यांचा सहभाग
*प्रत्येक कुल ३ ते ५ कोटींचे
*संस्कृत, योग, वेद, व्याकरणाबरोबरच संगणक, शास्त्र, तंत्रज्ञानाचेही अध्यापन