आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाेखा महाेत्सव: कणेरी मठात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - मठाचे स्वामी म्हटले की पाय धुऊन घेणारे, अंगारे- धुपारे देणारे महाराज असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र, सर्व अनिष्ट रूढींना फाटा देत प्राचीन भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करत त्याची महती पुन्हा एकदा पटवून देण्याचे कार्य करत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज. या मठात १९ जानेवारीपासून भारतीय संस्कृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. केंद्र व राज्यातील अनेक मंत्री, पाच राज्यांचे राज्यपाल या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे योगगुरू रामदेव बाबा यांचे योगाबाबत मार्गदर्शनही मिळणार आहे.

काडसिद्धेश्वर महाराजांनी आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय परंपरा यांचा सुरेख संगम साधत या मठात आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत. येथील सिद्धगिरी म्युझियम हे तर देश-विदेशातील पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आकर्षण केंद्रच ठरले आहे. रुग्णालय, सेंद्रिय शेती या माध्यमातूनही येथे भक्तीबरोबरच प्रत्यक्ष कृतीसाठीही प्रोत्साहन दिले जाते. याचाच एक भाग म्हणून भारत विकास संगम या संस्थेच्या वतीने कणेरी मठाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा महोत्सव घेतला जात आहे.

रविवारी शोभायात्रा
या महोत्सवासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च येणार असून देशविदेशातील १० लाख लोक सहभागी होतील, असा विश्वास महाराजांनी व्यक्त केला.
आपल्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन व्हावे, श्रद्धेतून विधायक परंपरा जोपासल्या जाव्यात,यासाठी हा महोत्सव आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज

असा असेल उत्सव
१८ जानेवारी : शोभायात्रा
१९ जानेवारी : आरंभोत्सव, मुख्य उद्घाटनावेळी विविध दालनांचा शुभारंभ
२० जानेवारी : कृषी उत्सव, कमी भांडवलात अधिक उत्पन्न व स्वास्थ्य देणा-या शेतीची तंत्रे मिळणार
२१ जानेवारी : वारकरी उत्सव, एक लाख वारक-यांचे भजन आणि कीर्तन
२२ जानेवारी : युवा ज्ञानोत्सव, युवकांना प्रेरणा व दिशा देणारे कार्यक्रम
२३ जानेवारी : मातृशक्ती उत्सव, आर्थिक सुरक्षितता, आदर्श परिवारासाठी महिलांना मार्गदर्शन
२४ जानेवारी : आरोग्य उत्सव, निरोगी राहण्यासाठी विविध पद्धतींचे उपचार, मार्गदर्शन
२५ जानेवारी : मंगलोत्सव, गाव-जिल्हानिहाय कृती कार्य्रकम ठरवणे