आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरच्या सत्कारामुळे अाशाताई भारावल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - अनेक वर्षे ‘सोज्वळ बहीण, बायको, वहिनी अशा साचेबद्ध भूमिका साकारताना मला जे वेगळं करायचं होतं त्यासाठी मी नाटकांनाही प्राधान्य दिलं,’ असे मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले. त्यांचं बालपण ज्या आजरा गावी गेले तेेेथील निर्धार संस्थेच्या वतीने अाशाताईंचा नुकताच सत्कार करण्यात अाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

आशाताईंचा जन्म गडहिंग्लजचा. त्यांचे वडील वनखात्यात नोकरीला होते. त्यांची बदली आजरा येथे झाल्यानंतर त्या लहानपणी आजऱ्यात वास्तव्यास होत्या. हाच धागा पकडून निर्धार संस्थेच्या वतीने त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गाैरव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ सूतगिरणीच्या चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी यांच्या हस्ते तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच संजीवनी सावंत यांच्या उपस्थितीत गंगामाई वाचन मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘माझ्या नाट्य, चित्रपट कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली. मात्र, ‘निर्धार’च्या आग्रहावरून मी आजऱ्याला आले. हा माहेरचा सत्कार असल्यासारखे मला वाटते,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. यानंतर प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी जोतिबाचा नवस, कुलस्वामिनी अंबाबाई, बाळा गाऊ कशी अंगाई आदी चित्रपट तसेच आजऱ्याबाबतच्या आठवणी सांगितल्या.

आजऱ्याच्या काळ्या जिरग्याच्या तांदळामुळेच मला हे सौंदर्य प्राप्त झाले असावे, अशा त्यांच्या टिप्पणीला रसिकांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ‘आशा काळे यांच्या चित्रपटांतून मिळालेल्या प्रेरणेतून कदाचित मी आज तहसीलदार झाले असावे,’ अशा भावना शिल्पा ठोकडे यांनी मांडल्या.

सभागृह उभे राहिले
गंगामाई वाचन मंदिरातील सभागृह गर्दीने भरले होते. आशाताईंचे आगमन झाले आणि ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटातील ‘साधी भोळी मीरा तुला कळली नाही’ हे गाणे सुरू झाले आणि चित्रच बदलून गेले. भारावलेल्या वातावरणात अख्खं सभागृह उभं राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

अजूनही रसिकांवर मोहिनी
गेली काही वर्षे आशाताई चित्रपट किंवा नाटकांमध्ये काम करत नाहीत. मात्र, त्यांच्या ३०- ४० वर्षांपूर्वीच्या चित्रपटांचा आणि भूमिकांचा किती प्रभाव आहे याचे प्रत्यंतर आजऱ्यात आले. वटपौर्णिमा असूनही महिलांबरोबरच पुरुषांनीही या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली. कार्यक्रम संपल्यानंतर फोटो काढण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती.
बातम्या आणखी आहेत...