आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात डॉल्बीच्या विरोधात विद्यार्थी, नागरिकांचा मूक मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर-  कोल्हापूर शहरामध्ये डॉल्बी लावण्यावरून आणि त्याला विरोध करण्यावरून या गणेशोत्सवात वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला पोलिस प्रशासन कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावू देणार नाही अशा पावित्र्यात आहे. तर दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांनी डॉल्बी समर्थकांसोबत न्यायालयाचे निकष पाळून डॉल्बी लावायला परवानगी द्यावी यासाठी कंबर कसली आहे.
 
डॉल्बीला विरोध
डॉल्बीला विरोध करणाऱ्या कोल्हापूर शहरातील काही सामाजिक संस्थानी मुख्य गणेश विसर्जन मार्गावरून मूक मोर्चा काढला. यामध्ये शाळकरी मुले आणि कोल्हापूरचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये डॉल्बीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचे फलक होते.
 
कोल्हापुरातील अनेक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणारच असा निर्धार केला आहे. मात्र पोलिस प्रशासनासह पालकमंत्र्यांनी डॉल्बी लावल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. स्वागत मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर गुन्हेही दाखल झाले. मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र डॉल्बी लावणाऱ्या मंडळांना पाठिंबा दिला आहे. डॉल्बीला विरोध करणाऱ्यांचे नेतृत्व करायला कोणीच नव्हते. मात्र काही सामाजिक संस्था यासाठी पुढे आल्याने आजचा मूक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाची सुरुवात मिरजकर तिकटी येथे श्री गणपतीच्या आरतीने करण्यात आली. मोर्चा शिस्तबद्ध रितीने छत्रपती शिवाजी चौकामध्ये आला असता यावेळी वनिता करंबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर निहारिका अमित साळोखे हिने मोर्चात सहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांना डॉल्बी विरोधी शपथ दिली. यानंतर सामूहिक आरती करण्यात येऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला.

मोर्चामध्ये देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बाबा इंदुलकर, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण शिराळे, शेखर कुसाळे, जयश्री जाधव, मनीषा कुंभार, भाग्यश्री शेटके, उमा इंगळे, कविता माने, माजी नगरसेवक विजय सरदार, सुभाष रामुगडे, प्रा. भारत खराटे, अशोक देसाई, विजय जाधव, अनुराधा भोसले, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...