कोल्हापूर- राज्यात भाजप-शिवसेनेचे युती सरकार शेतक-यांच्या प्रश्नांवर कोणतीच भूमिका घेत नसताना खासदार राजू शेट्टी गप्प कसे आहेत असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर नितीन गडकरी, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे यांच्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर दिले का हे जाहीर करावे अन्यथा सहकारमंत्र्यांनी या नेत्यांच्या कारखान्यांवर कारवाई करूनच दाखवावी, असे आव्हानही चंद्रकांत पाटलांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित केला होता. त्यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरात जाऊन अजित पवारांनी त्यांच्यावर निशाना साधला. अजित पवार म्हणाले, राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विदर्भ- मराठवाड्यातील शेतकरी होरपळत आहेत. असे असले तरी युतीचे सरकार काहीच भूमिका घेत नाही हे धक्कादायक आहे. आघाडी सरकारने त्यांच्या काळात शेतक-यांना कर्जमाफी केली होती. मात्र, युती सरकारने अद्याप कर्जमाफी केलेली नाही. त्यामुळेच विदर्भ-मराठवाड्यातील शेतक-यांच्या आत्महत्या कमी व्हायच्या ऐवजी वाढत आहेत. आम्ही शेतक-यांना जेव्हा कमी मदत करायचो तेव्हा स्वत:ला शेतक-याचे नेते म्हणवून घेणारे खासदार राजू शेट्टी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित केला. शेतक-यांच्या सर्व समस्यांवर व प्रश्नांवर राजू शेट्टी यांनी बोलले पाहिजे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा राजू शेट्टींनी बारामती, कराडमध्ये जाऊन आंदोलन केले होते. मग राजू शेट्टी आता नागपूरला जाऊन आंदोलन का करीत नाहीत, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
राज्यातील ऊस उद्योग अडचणीत आला आहे. शेतक-यांना मदत करण्याऐवजी सहकारमंत्री प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा पाठवणे, एफआरपीनुसार दर न देणा-या कारखान्यांवर कारवाई करीत आहे. साखर उद्योग अडचणीत असताना पवार साहेबांनी केंद्रातून वेळोवेळी मदत केली. मात्र, सध्या राज्यात व देशात भाजपचे सरकार असूनही शेतक-यांना मदत केली जात नाही. मदत करायची सोडून सहकारमंत्री कारखाने बुडवायला निघाले आहेत. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी सर्वप्रथम नितीन गडकरी, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे या नेत्यांच्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर दिला का नाही ते आधी जाहीर करावे अन्यथा इतरांप्रमाणेच त्यांच्या कारखान्यांवरही कारवाई करून दाखवावी असे खुले आव्हान अजित पवारांनी सहकारमंत्र्यांना दिले.