आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडे, गडकरींनी एफआरपी का दिला नाही? अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे विचारणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘जोपर्यंत दिल्लीत शरद पवार होते तोपर्यंत ऊस, दूध, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका घेतली गेली. कोणत्याही परिस्थितीत हमी भाव (एफआरपी) दिला पाहिजे असे सध्याचे मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री सांगत फिरत आहेत. तर मग त्यांच्याच पक्षाचे नेते महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कारखान्यांनी अजूनपर्यंत एफआरपी का दिला नाही?,’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी केंद्र आणि राज्याच्या कारभारावर टीका केली.

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर पवार यांचा हा कोल्हापुरातील पहिलाच कार्यकर्त्या मेळावा होता. पवार म्हणाले की ‘आमच्या कालावधीत राजू शेट्टी यांना ऊस दराच्या आंदोलनासाठी बारामती, कराड, इंदापूर दिसत होते. आता त्यांना नागपूर दिसत नाही काय? कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या दारात ते का बसत नाहीत?’ अशीही विचारणा त्यांनी केली.

या वेळी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, महिलाध्यक्ष संगीता खाडे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायीचे सभापती आदिल फरास, अनिल साळोखे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौरांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळला : लाचखोरी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी सध्या रुग्णालयात दाखल असल्याने अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत हा अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला. आता मंगळवारी याबाबत सुनावणी होईल.

लेटरपॅडपुरते नकोत
भाजपला आम्ही पाठिंबा देण्याबाबत काही चर्चा झाल्या असल्या तरी कार्यकर्त्यांनी संभ्रम ठेवू नये. जातीयवादी पक्षांच्या बरोबर आम्ही कधीच जाऊ शकणार नाही. त्यांच्या कारभाराविरोधात कार्यकर्त्यांना लढावे लागणार आहे. त्यामुळे केवळ लेटरपॅडपुरते सेलचे नेते आपल्याला उपयोगाचे नाहीत. लोकांना विश्वास वाटेल अशा पद्धतीने काम करा, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.

बदनामीचा संशय
राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांनी आपल्याला लाचखोरी प्रकरणामध्ये गोवले गेले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. भ्रष्टाचार करणार्‍या कोणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही. त्या जर दोषी आढळल्या तर कारवाई होणारच. मात्र माझ्या नवर्‍याचा खून झाल्याने याही प्रकरणात मला गोवले गेल्याचे त्या म्हणत आहेत. एक नागरिक म्हणून या बाजूचाही विचार होण्याची गरज माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.