आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरावाला बगल, तरीही महाराष्ट्राचा नारा बुलंद - नाट्यसंमेलनाचे सूप वाजले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नाट्यसंमेलनाच्या समारोपात परिवहनमंत्री दिवाकर रावतेंचा मोहन जोशी यांनी सत्कार केला. या वेळी संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज .
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी (बेळगाव) - सीमाभागात बेळगावमध्ये दोन दिवस चाललेल्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे रविवारी सूप वाजले. सुरुवातीपासूनच अपेक्षा होती तो सीमाभाग महाराष्ट्रात घेण्याचा ठराव झालाच नाही. तरीही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भाषणात ‘अखंड संपूर्ण जय महाराष्ट्र’चा नारा दिला आणि सीमाबांधवांनी ‘बेळगाव कारवार-निपाणीसह महाराष्ट्रात सामील झालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.

उद्घाटनावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे टाळले होते. त्यावरून रावते यांनी त्यांचा समाचार घेतला.रावते म्हणाले, पवारसाहेब तुम्ही ‘जय हिंद’ म्हटलेत, पण ‘जय महाराष्ट्र’ टाळून मराठी माणसाला का गिळून टाकलंत? निदान ‘जय कर्नाटक’ तरी म्हणायचे, असा उपरोधिक सल्ला रावते यांनी पवारांना दिला.

संमेलनातील तीनही दिवस बेळगाव महाराष्ट्रात सामील झालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र कर्नाटक पोलिसांनी मराठी सीमा भागाबाबत कोणताही ठराव किंवा विषय संमेलनात न मांडण्याची ताकीद दिल्याने संयोजकांचा नाइलाज झाला व बेळगावकरांच्या अस्मितेचा हा विषय संमेलनाच्या व्यासपीठावर आलाच नाही.

समारोपप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज, आमदार उदय सामंत, नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर, अध्यक्ष मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘समारोपाला उद्धव ठाकरे येणार होते, मात्र तुम्ही काय घोळ घातला हे तुमचे तुम्हीच बघा’ असा टोला रावतेंनी आयोजकांना लगावला.
कलाकारांच्या साहित्यासाठी गोडाऊन, बसेसना लागणारे कर, आठ वर्षांनी त्या बसेसवर घातली जाणारी बंदी, जादा रोड टॅक्समुळे बेळगावात पोहोचू न शकणारी मराठी नाटके हे प्रश्न सोडवले जावेत, अशी विनंती मोहन जोशी यांनी रावतेंकडे केले.
सीमाप्रश्नाचा ठराव टाळल्याने नाराजी
खुल्या अधिवेशनात चारच ठराव संमत झाले. त्यात सीमाभाग महाराष्ट्राला जोडण्याचा ठराव नसल्याने उपस्थितांची निराशा झाली. बालनाट्य रंगभूमीच्या विकासासाठी बालनाट्य संमेलन घेणार, दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली असे ठराव होते. नाट्य मंडळाच्या विशेष नियामक सभेतही सीमाप्रश्नी ठरावावर मौनच बाळगण्यात आले.
ग्रँड फिनाले रंगला, कलावंतांची पाठ
गिरीश जोशी, श्रीरंग गोडबोले यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेला मराठी कलाकारांचा ग्रँड फिनाले समारोपप्रसंगी चांगलाच रंगला. या मनोरंजनपर कार्यक्रमात अभिनेत्री अदिती सारंगधर, चंद्रकांत कुलकर्णी आदी कलाकार होते. मात्र, मुख्य प्रवाहातील तसेच सध्या चर्चेत असलेल्या मराठी कलाकारांनी संमेलनाकडे फिरवलेली पाठ रसिकांना खटकली.