आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan Opening In Belgaum

नाट्य महोत्सवासाठी पुढाकार घेऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव - राज्यात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव घेण्यासाठी शासन पुढाकार घेईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शनिवारी सायंकाळी त्यांनी नाट्यसंमेलनात हजेरी लावली. अन्य राज्यांमध्ये मराठी नाटके सादर करण्यासाठी येणार्‍या अडचणी शासन सोडवेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. मराठी रंगभूमीचा इतिहास उज्ज्वल आहे. मात्र, बंगाली रंगभूमीसारखी राष्ट्रीय पातळीवर मराठी रंगभूमीची दखल घेतली जात नाही. त्याच्या कारणांचाही शोध घेण्याची गरज आहे. मणिपूर रंगभूमीवरही चांगले काम होत असल्याचा दाखला देत त्यांनी नाटकांमधील आशयघनता याही पुढे अशीच कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई फिल्मसिटीचा मास्टर प्लॅन करताना मराठी रंगभूमीसाठी स्वतंत्र जागा ठेवण्याची सूचना अमिताभ बच्चन यांनी केली आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या वेळी मराठी नाट्य परिषदेच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
प्रायोगिक रंगभूमीसाठी हक्काची जागा देणे, रंगभूमीसाठी संशोधन आणि विकास विभागाची स्थापना यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे त्यांनी सांगितले.

आपल्या प्रास्ताविकात नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी शासनाची आर्थिक मदत ही वेळेत मिळाली तर बरे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावर बोलताना फडणवीस यांनी यापुढच्या काळात ती वेळेआधी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर फैय्याज, दीपक करंजीकर, किरण ठाकुर, लता नार्वेकर, अरूण काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राला अच्छे दिन
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ पहिला आला. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार लाभला. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मराठी माणसाला अच्छे दिन येण्यास सुरूवात झाली आहे असे सांगून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला आजच १०० दिवस पूर्ण होत असल्याने आजचा दिवस माझ्यासाठीही महत्वाचा असल्याचे फडणवीस म्हणाले.

सीमाप्रश्नाचा कुठेही उल्लेख नाही
सकाळी शरद पवार बोलताना आणि संध्याकाळी फडणवीस बोलायला उभे राहिल्यानंतर सीमाप्रश्नी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. मात्र या दोघांनीही आपल्या संपूर्ण भाषणामध्ये याबाबतचा एकही प्रश्न उच्चारला नाही. आता नाट्यसंमेलनाच्या समारोपावेळी तरी सीमाप्रश्नाबाबत ठराव होतो का याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.