आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Natya Sammelan Opening In Belgaum

कलेचे अभिसरण कधीही थांबू नये, नाट्यसंमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव - राजकीय व्यासपीठावर भांडणं होत राहतील, मात्र कला आणि संस्कृतीचं अभिसरण थांबता कामा नये, अशा शब्दांत बेळगाव नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनावेळी शरद पवार यांनी शनिवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटक या नात्याने शरद पवार यांनी नाट्य क्षेत्राचा आढावा घेतला. पायाचा त्रास होत असला तरी त्यांनी उभं राहून बोलण्याचा निर्णय घेतला, मात्र उपस्थित रसिकांनीच त्यांना बसून बोलण्याची विनंती केली आणि त्यांनी मग आपले लिखित भाषण वाचून दाखवले.

बेळगावच्या नागरिकांचा गौरव करतच त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. नाट्यपरंपरेचा आढावा घेतल्यानंतर ते म्हणाले, प्रादेशिक सीमांनी पाच दशकांपूर्वी आपली ताटातूट केली असली तरी मनं आमची अभंग आहेत. कारण तुमची नाळ मराठी मातीत पुरली आहे. या नाळेचं कुणा प्रांताशी किंवा जातीशी नातं नसतं, तर मातीशी असतं. बेळगावच्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. म्हणूनच हीच भावनिक जवळीक मला पुन्हा पुन्हा बेळगावला खेचून आणते, असे ते म्हणाले. ‘घाशीराम कोतवाल’सारखे नाटक परदेशात पाठवताना मला काय कसरत करावी लागली याची अनेक उपस्थितांना जाणीव आहे. प्र. के. अत्रे यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत आणि बालगंधर्वांपासून प्रशांत दामले, भरत जाधवपर्यंतच्या प्रवासाचा त्यांनी या वेळी धांडोळा घेतला.

सर्कस, तमाशा या थेट रसिकांसमोर सादर होणार्‍या कलाप्रकाराची वाताहत झाली. उतारवयात कलाकारांची परिस्थिती बिकट होते. सिनेसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत काही कलाकारांचे अंतिम दिवस कफल्लक अवस्थेत गेल्याची उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत कलाकारांना हक्काची घरं देण्याचा मी प्रयत्न केला. आजही सरकार कलाकारांना मानधन देतं, पण ते सारं अपुरं आहे. नाट्य परिषदेनं यावर विचार करून कलाकारांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही उपाययोजना सरकारला जरूर सुचवाव्यात. मीही आपल्या परीने आपली बाजू मांडेन, असे आश्वासन या वेळी त्यांनी कलाकारांना दिले.

संगीत रंगभूमी जिवंत ठेवणं हे कठीण काम नाट्य परिषदेला करावं लागणार आहे. फय्याज यांच्या नेतृत्वाखाली व अनुभवाच्या आधारे त्या दृष्टीनं पावलं उचलली जातील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. मान्यवर कलाकारांनी पुढे येऊन बाहेरगावी प्रयोग करायला प्राधान्य द्यायला हवं, अशी अपेक्षा पवार यांनीही या वेळी व्यक्त केली.

संयुक्त महाराष्ट्रासाठी घोषणा
नाट्यसंमेलनाच्या प्रारंभी जल्लोषात दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये सीमाभागाचे नेते किरण ठाकूर, महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मात्र, दिंडी परिसरात आल्यानंतर घाईतच या सर्वांना खाली ठेवून फय्याज आणि अरुण काकडे यांना रंगमंचावर नेऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी दीपक करंजीकर यांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. ‘बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणांनी मंडप दणाणल्यानंतर मोहन जोशी यांनी या सर्वांची भेट घेतली व किरण ठाकूर, महापौर व उपमहापौरांना सन्मानाने व्यासपीठावर नेण्यात आले. उद्धाटनापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

पवार थांबले अर्धा तास
उद्घाटनाच्या वेळेनंतर म्हणजेच साडेदहाला शरद पवार हे व्यासपीठावर हजर होते. मात्र, फय्याज आणि अरुण काकडे हे दिंडीत अडकल्याने पवार यांना त्यांची अर्धा तास वाट पाहावी लागली. तोपर्यंत मोहन जोशींकडून ते माहिती घेत होते. हा झालेला वेळ पाहून मोहन जोशी यांनी अतिशय मोजक्या शब्दांत मनोगत व्यक्त केले.