आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akhil Bhartiya Chitrapat Mahamandal Meeting Controvasial

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्कीचे सत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - सुमारे पाच तासांपेक्षा अधिक वेळ चाललेली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची शुक्रवारची द्वैवार्षिक सभा गोंधळ, धक्काबुक्की, आरोप-प्रत्यारोपाने गाजली. विरोधक व संचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्कीही झाली. त्याच महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.


चित्रपट महामंडळाच्या कारभाराला गेले वर्षभर विरोध होत आहे. पुण्यातील मानाचा मुजरा या कार्यक्रमावरील उधळपट्टी हा वादाचा विषय बनला आहे. याआधीचीही वार्षिक सभा गोंधळामध्येच तहकूब करावी लागली होती. शुक्रवारी दुपारी 2 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये सभेला सुरूवात झाली. अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी स्वागत करून कारकीर्दीतील निर्णयांची माहिती द्यायला सुरूवात केली. आपल्या कालावधीत अनेक निर्णय मार्गी लागले असताना विरोधकांनी मात्र अपप्रचार चालवला आहे, असा आरोप करत त्यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. सुर्वे यांचे काही शब्द खटकल्याने विरोधक आक्रमक झाले. शब्द मागे घेण्यासाठी गोंधळ सुरू झाला.
उपाध्यक्षांना भोवळ
गोंधळ सुरू असताना उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर व्यासपीठावरच चक्कर येऊन पडल्याने गोंधळ उडाला. नंतर आष्टकेर यांनीच सभेची सूत्रे हाती घेऊन विविध अहवाल व पत्रकांचे वाचन सुरू केले. परंतु सभेच्या ठिकाणी ऑडिटर उपस्थित नसणे, हातशिलकीची रक्कम, सविस्तर अहवाल सभासदांना का दिले नाहीत अशा प्रत्येक प्रश्नाला गोंधळ सुरू झाला. या सगळ्या दरम्यान एकमेकांना धक्काबुक्की करणे, माईक काढून घेणे, अंगावर धावून जाणे यासारखे प्रकार घडल्याने पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.
विजय कोंडकेंचाही विरोध
महामंडळाच्या संचालक मंडळात असलेले प्रख्यात दिग्दर्शक विजय कोंडके यांनीही सत्तारूढ पदाधिका-यांच्या कारभाराला व्यासपीठावरून जाहीर विरोध केला. महामंडळाचे निर्णय व काही अहवाल हे आपल्याला वेळेत मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पदाधिका-यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उभा केले, त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. खाली आक्रमक असलेले विरोधक आणि व्यासपीठावरूनही विरोध झाल्याने सत्तारूढ कोंडीत सापडल्याचे चित्र
निर्माण झाले होते.
कोल्हापूर- मुंबई वाद
मराठी चित्रपट महामंडळाचे 75 टक्के संचालक कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे साहाजिकच या मंडळावर कोल्हापूरचेच वर्चस्व दिसून येते. मात्र वर्चस्व स्थानिकांचे की मुंबईकरांचे या मुद्द्यावरूनही हा गोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया सभेला उपस्थित असलेल्या काही सदस्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. सभेदरम्यानही कोल्हापूर आणि मुंबईचे सभासद एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसले. सुरुवातीपासूनच गोंधळी वातावरणात सुरू झालेली ही सभा तब्बल सहा तासांपर्यंत चालली.
अलका कुबल, पाटकर यांनाही जुमानले नाही
आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ वाढल्याने महामंडळाचे संचालक विजय पाटकर आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यासपीठावरून विरोधकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही संतप्त सदस्यांनी जुमानले नाही. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मेघराज भोसले, अर्जुन नलवडे, यशवंत भालकर, हेमसुवर्णा मिरजकर, छाया सांगावकर यांनी पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेतली.