आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर - टोल नाही, तर टोला देणार, असा निर्धार व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा प्रचंड मोर्चाच्या माध्यमातून टोलविरोधात रोष प्रकट केला. सुमारे चार तास चाललेल्या मोर्चामध्ये सोमवारी हजारो नागरिक सहभागी झाले होते.
गेल्या दीड वर्षापासून कोल्हापुरात आयआरबी कंपनीविरोधात आंदोलन सुरू असून टोल देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कोल्हापूरच्या विविध संस्था, तालीम, मंडळांनी घेतली आहे. सोमवारच्या या मोर्चात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गांधी मैदानातून दुपारी साडेबारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
मोर्चा मिरजकर तिकटी, महाद्वार रोडवरून घोषणा देत तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी प्रमुख नेत्यांची भाषणे झाल्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. प्रचंड घोषणाबाजी, विविध पक्षांचे झेंडे नाचवत उत्साही कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याने टोलविरोधी वातावरणनिर्मिती झाली होती.
निवडणुकांचे प्रतिबिंब
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे प्रतिबिंब या मोर्चामध्ये दिसले. त्यामुळे शिवसेना, आरपीआय, डावे पक्ष, समर्थकांनी आपापल्या ध्वजांसह मोर्चात हजेरी लावली. शिवसेनेचे आक्रमक देखावे या मोर्चाचे आकर्षण ठरले. निवडणुकांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेली पोस्टर्स आगामी संघर्षाची झलक दाखवत होती दोन्ही मंत्री अनुपस्थित
कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपण जनतेबरोबर आहोत, परंतु मंत्रिमंडळाचे सदस्य या नात्याने तसेच पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे टोलविरोधी कृती समितीला कळवले होते. त्यानुसार दोन्ही मंत्री मोर्चामध्ये सामील झाले नाहीत.
टोलचा राक्षस आणि शिवसेनेचा बाण
शिवसेनेने ट्रॉलीवर टोलरूपी राक्षसाचा जिवंत देखावा तयार केला होता. या टोलरूपी राक्षसाला आमदार राजेश क्षीरसागर हे अधूनमधून बाण मारून ठार करत होते, असा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.