आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • भटक्या प्राण्यांना जीवदान देणारा ‘नॉनमॅट्रिक डॉक्टर’

भटक्या प्राण्यांना जीवदान देणारा ‘नॉनमॅट्रिक डॉक्टर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - समाजात माणुसकीचा झरा आटत चालला असल्याची कितीही आेरड हाेत असली तरी अजूनही कुठेना कुठे आशेचा किरण दिसून येताे. सांगलीतील मुस्तफा मुजावर हा दहावी नापास तरुण रस्त्यावरील अपघातात, मोठ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भटक्या जनावरांवर पदरमाेड करून उपचार करत त्यांना जीवदान देतोय. शिवाय भिकारी, मनोरुग्णांच्या जखमांवर उपचार करण्याचे कामही या तरुणाने सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केले आहे.

मुस्तफा हा एक पानपट्टी चालवणारा तरुण. प्राण्यांचा त्याला लहानपणापासूनच लळा. साधारणत: दहा वर्षांपूर्वी सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानातील प्राणिसंग्रहालय समृद्ध होते. तिथले प्राणी पाहायला, त्यांची देखभाल करायला मुस्तफा उत्स्फूर्तपणे जायचा. त्याचा हा प्राण्यांविषयीचा लळा पाहून महापालिकेचे तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण गोदाजी यांनी त्याला जखमी प्राण्यांवर प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण दिले. कालांतराने प्राणिसंग्रहालय संपले; पण मुस्तफाचे प्रेम कमी झाले नाही. मग तो रस्त्यावरील जखमी प्राण्यांवर उपचार करू लागला.

प्राण्यांवर प्रथमोपचाराचे एक किटच स्वत:सोबत बाळगायला सुरुवात केली. त्याला कोठेही रस्त्यात भटकी कुत्री, गाढव, घोडा, पक्षी असे प्राणी जखमी अवस्थेत दिसले की तो त्यांच्यावर उपचार करायचा. त्याच्या आवाक्याबाहेरची जखम असेल तर तो पशुचिकित्सकांकडे घेऊन जाताे. तो प्राणी पूर्णपणे बरा होईपर्यंत एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मुस्तफा त्याची देखभाल करताे.

या नि:स्वार्थी कामामुळे मुस्तफाला सांगली, मिरजेतील पशुवैद्यक उपचारासाठी मदत करतात. काही अन्य तरुणही त्याच्याशी जोडले गेले. त्यातून त्याने इन्साफ फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे; मात्र एरवी देशी-विदेशी निधी मिळवण्याच्या हेतूने चालवल्या जाणार्‍या सामाजिक संस्थांप्रमाणे तो कोणाकडेही निधीसाठी गेलेला नाही. स्वत:च्या खिशातून जमेल ती आणि मित्र देतील त्या पैशांतून तो हे काम अविरत करतो आहे.

राज्यातील पहिली जनावरांची अॅम्ब्युलन्स
स्वत:च्याच जगण्याचे वांधे असलेल्या मुस्तफाने मित्रांच्या मदतीने एक जुनी मोटार खरेदी करून तिला अॅम्ब्युलन्सचे स्वरूप दिले. राज्यातील जनावरांसाठीही ही पहिली अॅम्ब्युलन्स ठरली. मात्र, तिच्या देखभालीचा खर्च मुस्तफाच्या आवाक्याबाहेरचा असल्याने गेली सहा महिन्यांपासून ती जागेवरच आहे. त्याला मदत करणारे हात पुढे आल्यास मुस्तफाच्या कामाला आणखी बळ येऊ शकते.

रुग्णालयांनी नाकारलेल्या मनोरुग्णांवर उपचार
गेल्या आठवड्यात सांगलीवाडी येथील एका मनोरुग्णाच्या पायाला गँगरीन झाले. जखमेत किडे झाले. ही जखम घेऊनच तो मनोरुग्ण फिरत असे. त्याच्या नातेवाइकांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टर्सनी उपचार करायला नकार दिला. मुस्तफाने या रुग्णाच्या जखमेतील किडे काढले आणि मग त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले.

मानवी हस्तक्षेपाने प्राणी धोक्यात
मुस्तफाला जखमी अवस्थेत सापडणारे प्राणी हे बहुतेकदा माणसाच्या चुकांमुळेच जखमी अवस्थेत सापडतात. वाहनाने धडक दिल्याने जखमी होणारे प्राणी सापडण्याचे प्रकार तर वारंवार घडतात. पतंगाच्या मांज्यात अडकलेले पक्षी, दूषित पाण्यामुळे बेशुद्ध पडणारे प्राणी-पक्षी, मोठ्या पक्ष्यांनी जखमी केलेले छोटे पक्षी, जंगलातून भटकून मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी अशा प्राण्यांवर मुस्तफाने आजवर अनेकदा उपचार केले आहेत. माणसाच्या हस्तक्षेपामुळेच प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे, अशी खंत ताे बाेलून दाखवताे.
बातम्या आणखी आहेत...