आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणाविरोधी कायदा करण्यास भाग पाडणार, अंधश्रध्‍दा निर्मूलन समितीचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारने जादूटोणाविरोधी वटहुकूम काढला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी रान उठवून सरकारला भाग पाडू,’ असा निर्धार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला. या कायद्याबाबत पाठिंबा मिळविण्यासाठी चार महिन्यांत संपूर्ण राज्य पिंजून काढू, असे शेकापचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी जाहीर केले.

डॉ. दाभोलकर यांच्या पश्चात अंनिसचे काम कसे चालवायचे, धोरणे काय असावीत, कार्यकारिणीत बदल यासह अनेक विषयांवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी रविवारी सातारा येथील वेदभवन कार्यालयात अंनिसच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. एन.डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. दाभोलकर यांचे कुटुंबीय डॉ. शैला, डॉ. हमीद, व मुक्ता यांच्यासह अंनिसचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याची भूमिका विशद केली. डॉ. शैला म्हणाल्या, अंनिस हे डॉक्टरांनी नेहमीच कुटुंब मानले. आम्हीही या कुटुंबाचे घटक झालो आहोत. डॉक्टरांचे कार्य आता आपल्याला विवेकवादाचे अधिष्ठान न सोडता पूर्णत्वास न्यायचे आहे. डॉक्टरांनी विवेक आणि विज्ञान यांची सांगड घातली होती.

नकारात्मक विचार नकोत
अंधर्शद्धेच्या विरोधात जाण्यापेक्षा किंवा कोणाच्या निर्मूलनाच्या नकारात्मक विचारांपेक्षा विवेकवादी सकारात्मक विचार, कृती करण्याचे डॉक्टरांनी आयुष्यात ठरवले होते. त्याच मार्गाने आपल्याला जायचे आहे. डॉक्टरांनी आयुष्यभर सकारात्मक विचारांचा पुरस्कार केला, हा विचार प्रत्येकात जागवणे हे आपल्यापुढील आव्हान असल्याचे डॉ. शैला यांनी या वेळी नमूद केले. अविनाश पाटील यांनीही सर्व कार्यकर्ते दाभोलकर कुटुंबीयांबरोबर आहेत असे सांगून सर्वांना निर्धार शपथ दिली. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने मेळाव्याची सांगता झाली.


मतभिन्नता विसरून सर्वांनी एकत्र यावे
आपापसात काही वैचारिक मतभिन्नता असेल तर ती काढून टाका, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन लढा देण्याची ही वेळ आहे. जादूटोणाविरोधी कायद्यासाठी हिवाळी अधिवेशनात आपण शासनावर मोठय़ा प्रमाणावर दबाव आणला पाहिजे. आपण सगळे एकत्र आल्यास हे सहज शक्य आहे. जादूटोणाविरोधी विधेयकाचे आम्ही यापूर्वी वेळोवेळी सभागृहात व बाहेरही सर्मथनच केले. डॉक्टरांच्या पश्चात आता आपली जबाबदारी वाढली आहे. दाभोलकर महानायक होते, चतुरस्र होते. त्यांच्या कार्याला परिणाम देण्यासाठी आता चार महिने आपण पर्शिम करूया.’’ प्रा. डॉ.एन. डी. पाटील

आम्हाला पदे नकोत, कायद्यासाठी रान उठवू
अंनिसमध्ये आम्हाला कोणतेही पद नको. आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करू. प्रत्येक विवेकवादी विचारामागे समिती कृतिशीलपणे उभी राहील. डॉक्टरांनी ज्या जादूटोणाविरोधी कायद्यासाठी 16 वर्षे प्रयत्न केले ते आता आपल्याला जोमाने पुढे न्यायचे आहेत. त्यासाठी चळवळीत तरुणांचा मोठा सहभाग पाहिजे. येत्या चार महिन्यांत या कायद्यासाठी रान उठवले पाहिजे. सर्वप्रथम कार्यकर्त्यांची विचाराची पातळी, आत्मविश्वास वाढला पाहिजे. पूर्वी आमच्या प्रत्येक प्रश्नाला डॉक्टरांकडे उत्तर होते. मात्र यापुढे ज्येष्ठांचे मार्गदर्शन, प्रयत्न यातून पुढे गेले पाहिजे.’’ डॉ. हमीद दाभोलकर


अंनिसच्या आंदोलनाला वेग यावा
संघटनेत तरुणांचा सहभाग वाढवला पाहिजे. धर्मचिकित्सा करणे, चिकित्सकपणे काम करणे हा आपला श्वास व्हायला पाहिजे. तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा. दाभोलकरांना या गोष्टी अभिप्रेत होत्या. समाज विवेकवादी व्हावा असे त्यांना वाटत होते, त्यासाठीच ते सत्याग्रह, विचार, चर्चा या मार्गांनी जात होते. या आंदोलनांना आता वेग यायला पाहिजे.’’ अँड. मुक्ता दाभोलकर-पटवर्धन