आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्राह्मणवाद्यांकडून करकरेंची हत्या असा आरोप करणा-या मुश्रीफांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- 'हू किल्ड करकरे' हे आपले पुस्तक खपवण्यासाठी माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ हे सनसनाटी आरोप करत आहेत. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. 30 डिसेंबर रोजी कोल्हापुरात झालेल्या व्याख्यानात मुश्रीफ यांनी मुंबई हल्ल्याच्या वेळी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांची ब्राह्मणवाद्यांकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता.
क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, करकरे अन्य अधिकाऱ्यांची हत्या ही पाकिस्तानी अतिरेक्यांनी केल्याचे उघड झाले असताना, त्याला जगभराने मान्यता दिली असताना केवळ प्रसिद्धीसाठी पुस्तक खपवण्यासाठी मुश्रीफ हा उद्योग करत आहेत. त्यांच्या भाषणाची सीडी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणी करणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत शिवसेना- भाजपचे उमेदवार निवडून कसे येतात, असा प्रश्न मुश्रीफांनी उपस्थित केला आहे. मात्र, जनता त्यांना निवडून का देते याचा विचार करून डाव्या पक्षांनी आपली पात्रता ओळखावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. यापुढे मुश्रीफांनी कोल्हापुरात कार्यक्रम घेऊन दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. या वेळी मधुकर नाझरे, सुधीर जोशी, महेश उरसाल, जयदीप साळोखे उपस्थित होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्याम जोशी यांनीही पत्रकान्वये मुश्रीफ यांचा निषेध केला आहे.
भांडवलदार आणि माध्यमांवर ब्राह्मण्यवाद्यांची सत्ता असल्याने देशात अशांतता पसरवून त्यासाठी मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचे कारस्थान आयबी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहे. त्यामुळेच अनेक बॉम्बस्फोटांचा तपास झाला नाही. मात्र करकरे यांनी साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अनेक हिंदुत्ववाद्यांना अटक केली. त्यांच्याकडील 3 लॅपटॉपमधून अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली होती. भारतामध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी नेपाळ, इस्रायलशीही या सर्वांनी संपर्क साधला होता. या चर्चेचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळेच आपला बनाव उघडकीस येण्याच्या भीतीपोटीच पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्याची मदत घेऊन त्यावेळी दुसरी चकमक घडवून आणली. त्या ठिकाणी करकरे यांना पाठवून त्यांचा खून करण्यात आला असा आरोप मुश्रीफ यांनी चारच दिवसापूर्वी कोल्हापूरात केला होता.
माजी पोलिस महानिरीक्षक राहिलेल्या शमशुद्दीन मुश्रीफ यांनी सनसनाटी आरोप करताना माझे आरोप चुकीचे ठरवूनच दाखवा असे आव्हान दिले आहे. माझे आरोप कुणीही सप्रमाण खोटे ठरवावेत. अगदी उज्वल निकम यांच्याशीही याबाबत चर्चा करण्याची माझी तयारी आहे. हे माझे जाहीर आव्हान आहे. आयबी ही संस्था म्हणजे बिनबापाचे पोर आहे. ही संस्था सध्या भारतातील सर्वात बलाढ्य संस्था असून ती ब्राह्मणवाद्यांच्या संपूर्णपणे ताब्यात असून त्याच्या माध्यमातूनच देश चालवला जात आहे, असे आरोप मुश्रीफ यांनी केले होते.
वायरलेसवरील संभाषण, 3 लॅपटॉप, करकरेंचे मोबाइल संभाषण रेकॉर्डवर का आणले जात नाही, अमेरिकन गुप्तचर संस्थांनी बोट निघाल्याची अचूक माहिती देऊनही आयबीने हालचाल का केली नाही आणि कामा हॉस्पिटलमधील अतिरेकी तेथील कर्मचार्‍यांशी मराठीतून कसे बोलले? असे प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केले होते.