आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस आंदोलनातील जखमी स. फौजदाराचे निधन, राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- नोव्हेंबर 2012 शिरोळ तालुक्यात शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनात जखमी झालेले सहायक फौजदार मोहन दिनकर पवार (57) यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतमामात कसबा बावडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने शिरोळ पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांविरूद्ध हत्येचा गुन्हा (कलम 302) दाखल केला आहे. याआधी स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांना शेतक-यांना फसविल्याप्रकरणी अटक झाली होती. आता शेट्टीं यांच्यावर हत्येचा गुन्हा चालणार असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
12 नोव्हेंबर 2012 रोजी राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनास्थळी पवार ड्यूटीवर होते. त्यावेळी कर्तव्य बजावत असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्या डोक्यावरील हेल्मेट काढून त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने हल्ला केला होता. त्यात पवार गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर आतापर्यंत उपचार सुरु होते.काही काळानंतर त्यांना घरी सोडले होते. मात्र काही दिवसानंतर त्यांच्या नाकातून सतत पाणी येत होते. याबाबत अनेक चाचण्या सुरु होत्या. त्यांच्यावर ऑगस्टमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यादरम्यानच ते कोमात गेले. तेव्हापासून ते रूग्णालयातच होते. अखेर रविवारी त्यांचे निधन झाले. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. कोल्हापूर पोलिस दलाच्या जवानांनी तीन फैरी झाडत मानवंदना दिली. यावेळी पोलिस अधिकारी व कोल्हापूरमधील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.
मोहन पवार यांच्या मृत्यूनंतर राजू शेट्टींच्या विरोधात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेट्टींच्या अडचणीत भर पडली आहे.