कोल्हापूर - कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘अस्तू’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. समारोप समारंभामध्येच ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
जगभरातील चित्रपट पाहिल्याने त्यातील वेगवेगळे विषय, दिग्दर्शकाची भूमिका आणि चित्रपट निर्माण करण्याच्या विविध पध्दती यातून प्रेक्षकांच्या जाणिवा विकसित होतात, असे मत या वेळी बेनेगल यांनी व्यक्त केले. विजय तेंडुलकर यांच्याबरोबर कोल्हापूरला आल्याची आठवण सांगतानाच भारतातील एक मोठा कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांचा गौरव त्यांनी केला.
गेले सहा दिवस सुरू असलेल्या दुस-या चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. या वेळी बेनेगल यांच्या हस्ते लघुपटातील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘अस्तू’ चित्रपटातील भूमिकेबद्दल इरावर्ती हर्षे,जयजयकारमधील भूमिकेबद्दल संजय कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. लक्षवेधी पदार्पण हा पुरस्कार जयजयकारचे दिग्दर्शक शंतनू रोडे यांना मिळाला.
या वेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, रिलायन्स मीडिया वर्क्सचे प्रमुख वित्तीय अधिकारी मोहन उमरोटकर हे उपस्थित होते. दिलीप बापट यांनी बेनेगल यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. अभिनेता ऋषिकेश जोशी आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.