आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलीच न लागल्याने महालक्ष्मीच्या शालूचा लिलाव स्थगित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - तिरुपती देवस्थानहून काेल्हापुरातील श्रीमहालक्ष्मीसाठी नवरात्रात आलेल्या शालूचा मंगळवारी ठेवण्यात आलेला लिलाव स्थगित करावा लागला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ठरवलेल्या ५ लाख ४२ हजार या रकमेच्या वर कुणीच बोली न लावल्याने हा लिलाव स्थगित करण्यात आल्याचे समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी सांगितले. प्रतिवर्षी तिरुपती देवस्थानहून खास महालक्ष्मीसाठी नवरात्रामध्ये शालू पाठवण्यात येतो. मिरवणुकीने तिरुपतीचे पदाधिकारी हा शालू महालक्ष्मीला अर्पण करतात. त्यानंतर महिनाभराने या शालूचा लिलाव केला जातो. यंदाही हा लिलाव मंगळवारी दुपारी ३ वाजता गरुड मंडपामध्ये ठेवण्यात आला होता. या लिलावात भाग घेण्यासाठी ९ जण उपस्थित होते.

मात्र, तीन वर्षांतील शालूचा झालेला लिलाव व त्याची सरासरी काढून ५ लाख ४२ हजार ही बोलीची मूळ किंमत असल्याचे व याच्या पुढे बोली लावण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले. मात्र, याआधी असणारी तीन साडेतीन लाख रुपयांची बोलीची मूळ रक्कम यंदा वाढवण्यात आल्याने इच्छुकांनी बोलीच बोलली नाही. त्यामुळे हा लिलाव स्थगित करण्यात आला असून आता पुन्हा नव्याने तारीख जाहीर करण्यात येणार आहे. या वेळी समितीच्या पदाधिकारी संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते.
गतवर्षी ५ लाखात लिलाव
सन २०१२ मध्ये शालूचा लिलाव ३ लाख २१ हजारला झाला होता. २०१३ मध्ये तो ७ लाख ५० हजारला झाला, तर २०१४ मध्ये ५ लाख ५५ हजारला झाला. याची सरासरी काढून देवस्थान समितीने ५ लाख ४२ हजार रुपये ही बोलीची मूळ किंमत ठरवली होती, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता समितीपुढे पुन्हा ठराव मांडून नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सचिव शुभांगी साठे यांनी दिली.