आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leaders Involved In Sangali Against State Government

राज्य सरकारविरोधी आंदोलनात सांगलीत भाजपचे नेतेच सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘कृष्णा खोरे सिंचन योजनेतून पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात समावेश करण्याची परवानगी द्या,’ अशी मागणी करत जत तालुक्यातील ६७ गावांतील लोकांनी काढलेल्या पदयात्रेची साेमवारी सांगता झाली. या वेळी सत्ताधारी भाजपचे खासदार, आमदार या पदयात्रेत सहभागी झाल्याने या आंदोलनामागच्या हेतूबाबतच शंका उपस्थित केली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तहानलेल्या ४२ गावांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्या वेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या गावांना ‘आमची सत्ता आल्यावर प्रश्न सोडवू’ असे आश्वासन दिले होते. देशात भाजपची सत्ता येऊन वर्ष, तर राज्यात युतीची सत्ता येऊन सहा महिने उलटले तरीही दोन्ही सरकारांनी या प्रश्नाबाबत काहीही ठोस भूमिका घेतलेली नाही. म्हणून याविरोधात स्थापन झालेल्या पाणी संघर्ष समितीने आंदोलनाची भूमिका घेतली. समितीत असलेले भाजपचे जत तालुक्याचे पदाधिकारी सुनील पोतदार यांनीच सरकारच्या विरोधात उमदी ते सांगली पदयात्रेची घोषणा केली.

१ जुलैला उमदीतून निघालेल्या या पदयात्रेच्या प्रारंभाला भाजपचे खासदार संजय पाटील, जतचे भाजपचे आमदार विलास जगताप उपस्थित होते. सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या पदयात्रेची सांगता होणार होती. तत्पूर्वी शहरातून निघालेल्या पदयात्रेत खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, विलास जगताप, भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख, भाजपचे सांगली शहर-जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार हे प्रमुख नेते सहभागी झाले. सांगता समारंभावेळी झालेली सभाही भाजपच्या नेत्यांनी ताब्यात घेतली. त्यामुळे हे आंदोलन नेमके कोणाचे आणि कोणाच्या विरोधात, हाच प्रश्न पडला होता. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सरकारविरोधातील आंदोलनात भाजपच्या नेत्यांचा सहभाग भुवया उंचावणारा होता.

पदयात्रेची उलटी परिक्रमा पूर्ण
जत तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांनी १९८४ मध्ये सांगली ते उमदी पदयात्रा काढली होती. या घटनेला २१ वर्षे पूर्ण झाली. आता हीच पदयात्रा उमदी ते सांगली अशी उलटी निघाली. या २१ वर्षांत मूळ प्रश्न तसाच राहिला हे विशेष.