आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट सहा जण ठार; चार गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोट झाल्यानंतर आगीने पेट घेतला.
सांगली - सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद येथे शोभेची दारू तयार करण्याच्या कारखान्यात स्फोट होऊन सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

स्फोटामध्ये कारखाना मालक रामचंद्र गुरव यांचा मुलगा अनिकेत (१६), जुबेदा अकबर नदाफ (४४), इंदाबाई तुकाराम गुरव (७०) आणि सुनंदा राजेंद्र गिरी (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघा मृतांची ओळख पटली नाही. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे शोभेची दारू तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. तासगाव रस्त्यालगत रामचंद्र गुरव यांच्या मालकीचा ईगल फायरवर्क्स हा कारखाना आहे. या कारखान्यात सायंकाळी सहाच्या सुमारास फटाके तयार करण्यासाठी
आणलेल्या रसायनांचा स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की यामध्ये कारखान्याची संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. त्या वेळी कारखान्यामध्ये नऊ जण काम करत होते, तर दोघे बाहेरगावाहून फटाके खरेदीसाठी आले होते.

स्फोट इतका शक्तिशाली होता की तेथे काम करणा-यांचे तुकडे- तुकडे झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून आणि दोन खासगी जीपमधून सांगलीला आणण्यात आले. मृत आणि जखमींचे चेहरेही जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते. आमदार सुमन आर.आर.पाटील यांनी घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.
घटनास्थळाची स्थिती भयावह होती. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी बसस्थानकावर आणण्यात आले. मात्र कोणीही वाहनधारक त्यांना रुग्णालयात न्यायला तयार नव्हता. त्यावेळी जीपचालक उदयसिंह घोरपडे आणि रणधीर सोनवणे यांनी चार जखमींना जीपमध्ये घालून सांगलीच्या शासकीय रुग्णायलात दाखल केले.

दोन वर्षांतील दुसरी घटना
कवठे एकंदला दरवर्षी दस-याच्या दिवशी ग्रामदैवताच्या यात्रेत शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. त्यामुळे येथे फटाके तयार करण्याचे कारखाने आहेत. २०१३ मध्ये अशाच एका कारखान्यात स्फोट होऊन आठ जण ठार झाले होते. त्या वेळी जिल्हा प्रशासनाने सर्व कारखाने गावाबाहेर काढण्याचे आदेश दिले होते. दरवर्षी यात्रेवेळीही स्फोटाच्या घटना घडतात; मात्र श्रद्धेपायी गावकरी त्याकडे कानाडोळा करतात.