आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील नयन फाउंडेशन, साताऱ्याच्या तरुणांनी दिले विद्यार्थ्यांना पाठबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- जिद्द केली तर कुठलीच गाेष्ट अशक्य नाही. मुंबईतील नयन फाउंडेशनच्या १४ ते १६ वयाेगटातील ८५ अंध विद्यार्थ्यांनी नुकताच श्रीक्षेत्र सज्जनगड सर करून याची प्रचिती दिली अाहे. सज्जनगड संस्थानच्या वतीनेही या मुलांचा यथोचित सत्कार केला. इतकेच नव्हे, तर त्यांना ब्रेल लिपीतील दासबोधाची प्रत भेट देत ‘यत्न तो देव जाणावा’ या त्यांच्या कृतीला दाद दिली.

श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड सातारा शहराजवळ अाहे. भक्ती आणि शक्तिपीठ म्हणून अाेळख असलेल्या या गडाचे पर्यटकांना नेहमीच अप्रूप वाटत असते. या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. गडाखालील परळी गावापासून सुमारे ९६७ पायऱ्या चढून सुमारे ते १० किलाेमीटर पायपीट करत जाण्याचा एक मार्ग शारीरिक ताकद जाेखणारा, तर दुसरा मार्ग अतिशय सुकर. गडापर्यंत गाडीने जाऊन केवळ ८० पायऱ्यांचे अंतर पायवाटेने जाण्याचा. बहुतांश भक्त, पर्यटक याच साेप्या मार्गाचा वापर करतात.

नयन फाउंडेशन ही मुंबई येथील अंध मुलांसाठी काम करणारी संस्था. अाठवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुंबईतील अंध मुला- मुलींची सहल या फाउंडेशनने गुरुवारी सज्जनगडावर अाणली हाेती. जिद्द, चिकाटी आणि शारीरिक कमतरतेवर मात करण्यात हे मुले तरबेज अाहेत याचा विश्वास असल्याने फाउंडेशनच्या संचालकांनी गडावर जाण्यासाठी साेपा मार्ग स्वीकारता गड सर करण्याचे अाव्हान विद्यार्थ्यांसमाेर ठेवले या जिगरबाजांनीही ते सहजतेने स्वीकारले.
गुरुवारी सकाळी परळीपासून गड चढणे सुरू केले. या मुलांसाठी हा अनुभव विलक्षण हाेता. वाटेतील चढ, उतार, वळण, निसरडी- घसरडी वाट, वरून येणारे लहान- मोठे दगड चुकवत, एकमेकांना मदत करत, काठीचा आधार घेत ही मुले- मुली जिद्दीने गड चढत हाेती. सातारा येथील कैलास बागल, डाॅ. प्रमाेद कुचेकर, प्रणव महामुने, मृणाल सावंत, अनिल दाणी, उर्वशी पवार आणि त्यांच्या मित्रांनी या मार्गात त्यांना अावश्यक तेवढी मदत केली. या सर्वांच्या सहकार्याने या मुलांनी गड चढण्याची माेहीम फत्ते केली. सज्जनगड संस्थानच्या वतीने या मुलांचा सत्कार करण्यात आला.

सज्जनगडावर पायी चढाई करणारे मुंबईतील नयन फाउंडेशनचे दृष्टिहीन विद्यार्थी, सोबत संस्थेचे संचालक.

जिद्दीच्या जाेरावर अंध मुलांनी सर केला सज्जनगड !