आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहास खामकरच्या ‘खाऊगिरी’ने कोल्हापूरकरांना धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्या बॉडी बिल्डर्सची पोस्टर्स चौकाचौकात पाहून तरुणांना प्रेरणा मिळायची, त्याच कोल्हापूरच्या चौकाचौकात सोमवारी त्याच्या ‘खाऊ‘गिरीची चर्चा रंगली होती. ‘मि. इंडिया’, ‘मि. आशिया’ यासह अनेक मानाचे किताब पटकावणार्‍या सुहास खामकरला राज्य शासनाने थेट नायब तहसीलदारपदी नेमले होते. मात्र पनवेल येथे 50 हजार रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आल्याचे वृत्त कळताच त्याला ‘आयकॉन’ मानणार्‍या बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील युवकांचे चेहरेच उतरले.

गेली अठरा वर्षे या क्षेत्रामध्ये झळकत असलेल्या एका पानपट्टीवाल्याच्या या पोराला प्रशिक्षक बिभीषण पाटील यांनी घडवले. शाहू साखर कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांनी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. अनेकांच्या सहकार्याने सुहासच्या दंडाची बेटकुळं फुगायला लागली आणि एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल 9 वेळा ‘मिस्टर इंडिया’ आणि तीन वेळा ‘भारत श्री’ चा सन्मान त्याने मिळवला.

भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुहास चमकला आणि ‘शरीरसौष्ठव’मधील त्याचे कौशल्य वाखाणले जाऊ लागले. पैसा, मान, प्रतिष्ठा मिळाली तर राजारामपुरीच्या दौलतनगर झोपडपट्टीत राहणार्‍या सुहासने प्रतिभानगरसारख्या पॉश भागामध्ये बंगला बांधला. क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणार्‍या खेळाडूंना थेट अधिकारपदाच्या जागा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि 2013 मध्ये पनवेलचा नायब तहसीलदार म्हणून सुहासची नियुक्ती झाली. पोरगं आता मार्गाला लागलं अशी भावना व्यक्त होत असतानाच सोमवारी सुहासला अटक केल्याच्या बातम्या झळकल्या आणि सुहासचं ‘नैतिक सौष्ठव’ कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले.

शासनाची जाहिरात आणि सुहासची अटक
खेळामध्ये चांगली कामगिरी करणार्‍यास शासन अधिकारी पदावर नेमते, अशी जाहिरात सोमवारच्याच सर्व दैनिकांमधून महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली आहे. बीडचा खेळाडू नवनाथ फरताडे हा असाच अधिकारी बनल्याचे त्याच्या छायाचित्रासह या जाहिरातीत दाखवण्यात आले. याच दिवशी शासनाच्या याच योजनेच्या माध्यमातून अधिकारी बनलेल्या सुहासला अटक व्हावी हा दुर्दैवी योगायोग. ‘शासनाने दिलं आणि सुहासच्या कर्मानं नेलं’ अशाच प्रतिक्रिया या निमित्ताने कोल्हापुरातील युवकांत उमटल्या.