आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Call Cntre For Drought Affected People Cm Prithivaraj Chavan

दुष्काळग्रस्तांना तक्रारी मांडण्यासाठी कॉल सेंटर उभारणार - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - कुठे टँकर मिळत नाही, तर कुठे चारा छावणीत जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. मात्र, या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचतच नाहीत. दुष्काळग्रस्त जनतेचे गा-हाणे सरकारपर्यंत पोहोचावे यासाठी मुंबईत राज्यस्तरीय कॉल सेंटर उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केली. तसेच फळबागा वाचवण्यासाठी राज्य शासन शेतक-यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करेल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून निघालेल्या संवाद पदयात्रेचा समारोप मंगळवारी सांगली जिल्ह्यातील भिवघाट येथे झाला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी विश्वजित कदम यांनी 23 दिवसांच्या पदयात्रेदरम्यान पाहिलेल्या दुष्काळी स्थितीचा आणि दुष्काळाबाबत सरकारकडून अपेक्षांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारला पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. गरज भासेल तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत. पण अनेक गावांत टँकरलाही पाणी मिळत नाही. त्यासाठी उपलब्ध स्रोतांतून पाणीपुरवठा करण्यासाठी इमर्जन्सी प्लॅन तयार
करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. पाणी कोठूनही आणावे लागले तरी त्यासाठी निधी देण्याची सरकारची तयारी आहे. प्रशासनाने मात्र खराखुरा अहवाल द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जनतेच्या गा-हाण्यांची थेट दखल घेणे शक्य होणार दुष्काळी गावांतील लोकांच्या पिण्याचे पाणी आणि चारा छावण्यांबाबत तक्रारी आहेत. मात्र, त्या सरकारपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यासाठी मुंबईत राज्यस्तरावरचे कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे सरकारला नेमकेपणाने आणि थेटपणाने लोकांपर्यंत पोहोचता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
रोहयो मजुरी 162 रुपये

‘राज्याच्या काही भागांत द्राक्ष, डाळिंब, मोसंबीच्या बागा अजूनही तग धरून आहेत; मात्र येणा-या काही दिवसांत त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला नाही त्या जगणार नाहीत. या बागा जिवंत ठेवण्यासाठी सरकार शेतक-यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा विचार करत आहे. रोजगार हमीच्या कामांसाठी 1 एप्रिलपासून 162 रुपये मजुरी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने निधी दिला तर ही रक्कम 180 रुपयांपर्यंत नेण्याचाही राज्य शासनाचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
युवक काँग्रेसच्या मागण्या
विश्वजित कदम यांनी पदयात्रेत पाहिलेली दुष्काळाची स्थिती आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा अहवाल वाचून दाखवला. पिण्याच्या पाण्याचा मूलभूत हक्कात समावेश करावा, दुष्काळी शेतक-यांचे वीज बिल माफ करा, विद्यार्थ्यांची फी माफ करा, रोहयोची मजुरी 175 करा आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.