आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मस्थळ अपूर्ण, समाधी अन‌् स्मारक लालफितीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्यांनी आपल्या क्रांतिकारी निर्णयांनी देशभराचे लक्ष वेधून घेतले, ज्यांचे नाव घेतल्याशिवाय राजकीय नेत्यांचा एक दिवसही जात नाही त्या छत्रपती शाहू महाराजांच्या काेल्हापुरातील जन्मस्थळाचे काम अपूर्ण आहे. त्यांनी ज्या ठिकाणी समाधी उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती ते कामही अजून सुरूच झाले नाही. आघाडी सरकारच्या काळात जाहीर झालेल्या स्मारकाचे काम अजूनही लालफितीत अडकले आहे. शाहू महाराजांशी संबंधित कोल्हापुरातील या तीनही प्रकल्पांची ही अवस्था राज्यकर्त्यांची अनास्थाच दाखवून देते.

नूतनीकरण अपूर्णच
कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये महाराजांचा जन्म झाला. या जन्मस्थळाच्या नूतनीकरणाच्या कामाला आॅगस्ट २०१२ ला सुरुवात झाली. आतापर्यंत खर्च झालेल्या ४.१९ कोटी रुपयांमध्ये जन्मस्थळाचे नूतनीकरण पूर्ण झाले परंतु वस्तुसंग्रहालय व अन्य कामांना सहा महिने लागणार आहेत. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नूतनीकरण पुढील शाहू जयंतीपर्यंत पूर्ण हाेईल, असे सांगितले हाेते. या संग्रहालयासाठी साडेसहा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रतीक्षा निधीची
दसरा चौकापासून जवळच नर्सरी बागेत आपली समाधी उभारावी असे शाहू महाराजांनी लिहून ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर ५८ वर्षांनी शहाजी महाराजांनी समाधी बांधण्यासाठी प्रयत्न केला. १९८० मध्ये ५९ हजार रुपयांचा आराखडा तयार झाला. मात्र नंतर हा विषय रखडला. आता महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रकल्पासाठी ७ कोटींची गरज असताना पालिकेने ७५ लाखांची तरतूद केली आहे. उर्वरित पैशासाठी शासनावर अवलंबून राहावे लागणार आहे.

भव्य आराखडे पण निधीचे काय?
या तीनही प्रकल्पांचे भव्य आराखडे तयार करण्यात आले. परंतु त्यासाठीचा निधी सातत्याने उपलब्ध करण्यात अपयश आले आहे हे वास्तव आहे. त्यामुळेच उपलब्ध होणार निधी, व्यवहार्य बाबी आणि प्रत्येक प्रकल्पामध्ये तोचतोचपणा येणार नाही याचे नियोजन करून तातडीने हे प्रकल्प मार्गी लावण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...