कोल्हापूर- ‘जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बाहुबली क्षेत्राला अहिंसा क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी येणारे सर्व अडथळे शासन दूर करेल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. हातकणंगले तालुक्यातील बाहुबली येथे आयोजित महामस्तकाभिषेक कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
या ठिकाणी नळपाणी योजना, खुले सभागृह आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आदी मागण्या विविध योजनांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या सोबत त्यांनी बाहुबलींचे दर्शन घेतले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमोल महाडिक, आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.