आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Colonel Mahadik Sufferer While Fight With Terrorist

कर्नल महाडिक शहीद, वाचा चित्तथरारक चकमक, धोनीला शिकवले पॅराग्लायडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मनीगामच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी होते. दहशतवादविरोधी लढ्यात यापूर्वी शौर्यपदक देऊन सरकारच्या वतीने त्यांचा गौरवही करण्यात आला होता. दरम्यान, श्रीनगरच्या आर्मी बेस कॅम्पवर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी ठेवण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील मुळागावी त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी आणले जाणार आहे. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कर्नल महाडिकांच्या नेतृत्वात अशी उघडण्यात आली होती धाडसी मोहिम
कुपवाडामधील हाजीनाका जंगलात असलेल्या डोंगराळ भागात काही दहशतवादी दबा धरुन बसले होते. त्यांच्याजवळ मोठा शस्त्रसाठा आणि जिवनावश्यक वस्तू होत्या. काश्मिरसह देशात काही तरी मोठा घातपात करण्याचा त्यांनी कट रचला होता. काही दिवसांपूर्वी याच दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला केला होता. तेव्हापासून हे दहशतवादी लष्कराला चुकवीत होते.
या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम 41 राष्ट्रीय रायफल्सला सोपविण्यात आली होती. कर्नल महाडिक हे ४१ राष्ट्रीय रायफल रेजिमेंटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. हाजीनाका जंगलातील डोंगराळ भागात अतिशय बिकट परिस्थिती आहे. दाट जंगल, उभे पर्वत, खोल दऱ्या आणि प्रचंड थंडी. दीड दिवसांच्या शोध मोहिमेनंतर महाडिक यांच्या टीमला दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागला. त्यांनी दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार केला. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. यात महाडिक यांनी दहशतवाद्यांना जेरीस आणले. आता दहशतवाद्यांचा खातमा अगदी निश्चित होता. पण एक गोळी महाडिक यांच्या डोक्याला लागली. यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
धोनीलाही शिकवले पॅराग्लायडिंग
पोगरवाडीतील महाडिक कुटुंबीयांचा पारंपारिक दूध विक्रीचा व्यवसाय होता. पण त्यात संतोष यांचे कधी मन रमले नाही. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसवत नसे. संतोष उत्तम गोलकिपर होते. त्यांना बॉक्सिंग, ट्रेकिंग आणि घोडेस्वारी आवडायची. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला ऑगस्ट महिन्यात पॅराग्लायडिंग शिकवले होते.
मित्रांनी जाग्या केल्या आठवणी
त्यांच्याबद्दल बोलताना कर्नल गिरी कोल्हे म्हणाले, की संतोषला कधी मरणाची भीती वाटली नाही. देशासाठी सर्वोच्च बलिदान करण्याची त्याची तयारी होती. बऱ्याच वेळा तो तसे बोलूनही दाखवायचा. त्याचे शब्द कधी खरे ठरतील असे मला वाटले नव्हते.
सैनिकी शाळेचे मुख्याध्यापक कॅप्टन एस. मुजुमदार म्हणाले, की लष्कराबाबत संतोष कायम उत्साहाने बोलायचा. लष्करात येण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन द्यायचा. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी येण्याचे आश्वासन त्याने दिले होते.
कर्नल महाडिक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सध्या त्यांचे कुटुंब काश्मिरातील उधमपूरमध्ये राहायला होते. त्यांचा मुलगा 5 तर मुलगी 11 वर्षांची आहे.
का घेतला जातोय दहशतवाद्यांचा शोध
- सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी घुसखोरी करुन पाकिस्तानातील काही दहशतवादी काश्मिरमध्ये आले आहेत. काश्मिरमधील घनदाट जंगलांमध्ये त्यांचा शोध घेतला जात आहे.
- गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मिरमध्ये घुसखोरीच्या 70 घटना घडल्या होत्या. यात 65 दहशतवादी एलओसी ओलांडण्यात यशस्वी झाले होते.
- 2013 मध्ये घुसखोरीच्या 91 घटना घडल्या होत्या. त्यात 97 दहशतवादी भारतीय भूमिवर दाखल होण्यात यशस्वी झाले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, एनडीएमधून घेतले होते प्रशिक्षण.....फोटोंमध्ये बघा श्रीनगरच्या आर्मी बेस कॅम्पवर वाहण्यात आली श्रद्धांजली....संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वाहिली साताऱ्याच्या विराला ट्विटरवर श्रद्धांजली....