छायाचित्र : सुनील चव्हाण आणि त्यांची पत्नी शैलजा
सांगली - सांगली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री दुहेरी हत्याकांड घडले. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण (वय ५५) व त्यांची पत्नी शैलजा (४७) यांचा अज्ञात व्यक्तींनी खून केला. राजकीय वादातून हा खून झाल्याचा संशय आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या शेतातील कामगार पसार झाला आहे. त्यामुळे संशयाची सुई त्याच्यावर आहे.
सुनील चव्हाण हे पत्नीसह जत तालुक्यातीळ डफळापूर येथे शेतात घर बांधून राहत होते. त्यांची दोन मुले शिक्षणासाठी मुंबई व सांगली येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात लोक चव्हाण यांच्या घरात शिरले. त्यांनी चव्हाण आणि त्यांची पत्नी शैलजा यांच्यावर सत्तुर, विळा आणि मोटारसायकलच्या चेनने प्राणघातक हल्ला केला. चव्हाण यांनी कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोरांची संख्या जास्त असावी, त्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. दोघेही मृत झाल्यानंतर हल्लेखोरांनी चव्हाण यांच्याच जीपमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र थोड्या अंतरावर जीप बंद पडल्याने ती तिथेच सोडून हल्लेखोर पसार झाले. सुरुवातीला हे हत्याकांड चोरीच्या उद्देशाने झाल्याचा संशय होता; मात्र या दांपत्याच्या अंगावरील दागिने व घरातील रोकड जागच्या जागी असल्याचे आढळून आले आहे.
माजी आमदाराला फोन
चव्हाण दांपत्याचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी चव्हाण यांच्या
मोबाइल फोनवरून जतचे माजी आमदार उमाजी सनमडीकर यांना फोन केला आणि ‘मी सुनील चव्हाण बोलतोय’ असे सांगितले; मात्र सनमडीकर यांना आवाज ओळखीचा वाटला नाही. मंगळवारी सकाळी चव्हाण यांच्या खुनाची बातमी ऐकल्यावर त्यांना धक्का बसला. हल्लेखोरांनी चव्हाण यांच्या पत्नीचा फोन पळवून नेला आहे.