कोल्हापूर - ‘मी महात्मा गांधींना हायजॅक केल्याचा आरोप काँग्रेसवाले करत आहेत. मात्र गांधीजी महात्मा होते. त्यांना कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी तर कधीच गांधींना सोडले असून त्यांचे फक्त ‘गांधीछाप नोटांवर’च प्रेम आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोल्हापूरच्या सभेत हल्ला चढवला. ‘नाव बुडणार असल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवार राज्यसभेत जाऊन बसले,’ असे सांगताना मोदींनी पवारांची ‘चतुर इन्सान’ अशी संभावना केली.
तपोवन मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी खासदार राजू शेट्टी, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. ‘लोकसभेला जनतेने दोन्ही काँग्रेसना दणका दिला. आता विधानसभेलाही त्यांच्या इतक्या जागा कमी होतील की सूक्ष्मयंत्रानेच त्या शोधाव्या लागतील. दोन्ही काँग्रेस हे दोन ‘दल’ असले तरी त्यांचे ‘दिल’ एकच आहे. या दोघांनी आता महाराष्ट्रात लुटायला काहीतरी शिल्लक ठेवले आहे का?’ असा आरोप करत मोदींनी टीकेचा समाचार घेतला.
तीर्थक्षेत्र अन् कोल्हापुरी चप्पल : करवीरनिवासिनी महालक्ष्मीला वंदन, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कारभाराची प्रशंसा आणि कोल्हापुरी चपलेपासून गुळापर्यंतचा उल्लेख करत मोदी यांनी स्थानिकांची मने जिंकली. प्रचंड मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांनी या वेळी ‘मोदीं’चा जयघोष केला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जर राष्ट्रीय तीर्थस्थळाचा दर्जा दिला असता तर गोरगरिबांना काम मिळाले असते. मात्र काँग्रेसच्या राजवटीत हे झाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘देशाकडे कुणी वाकडी नजर करणार नाही’
‘कोल्हापुरात मला दर्शनासाठी जाता आलं नाही, मात्र देवीनं लक्ष्मीचा इतका वर्षाव करावा की देश संकटातून मुक्त होऊ दे,’ अशी प्रार्थना मोदी यांनी केली. सर्वसामान्य, गरिबांचा विकास कसा करायचा हे दाखवून देणा-या शाहू महाराजांच्या भूमीमध्ये मी आलो आहे. हिंमतवान ताराराणीच्या भूमीमध्ये मी आलो आहे. हीच प्रेरणा घेतली तर देशाकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही,’ असेही मोदींनी सांगितले.
मोठे व्हिजन नाही, पण छोट्यांसाठी काम करीन
‘लोक म्हणतात मोठे व्हिजन दाखवा, परंतु माझ्याकडे मोठे व्हिजन वगैरे काही नाही. मी सामान्य, गरीब घरातून आलो आहे. आईला दवाखान्याला नेण्यासाठी हातात पैसे नसले की काय होतं याची मला जाणीव आहे. म्हणूनच मला मोठ्या लोकांसाठी मोठे व्हिजन ठेवण्याऐवजी छोट्या लोकांसाठी छोटी छोटी कामं करायची आहेत,’ असेही सांगत मोदींनी उपस्थितांच्या भावनेला हात घातला.
‘देशाच्या प्रगतीसाठी कोल्हापुरी चप्पल हवी’
देश आणखी वेगाने प्रगती करण्यासाठी कोल्हापुरी चप्पल हवी, अशा भाषेत मोदींनी पुन्हा एकदा कोल्हापूरचा उल्लेख केला. कोल्हापुरात माझे अनेक गाववाले गुळाचा व्यापार करतात. त्यामुळे मी लहानपणापासून कोल्हापूरला ओळखतो, असेही नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातील सभेत नमूद केले.
नाशिकची सभा पावसामुळे रद्द
शहरात रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात गारांसह मुसळधार पाऊस झाल्यामुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रद्द करावी लागली. दहा ते पंधरा मिनिटांत सुमारे ६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली होती. रविवारी मोदींची तपोवन येथे सभा होणार होती. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र मुसळधार पावसामुळे सभास्थळी लावण्यात आलेले फलक, स्टेजवर लावण्यात आलेला कपडा फाटला, खुर्च्याही खाली पडल्या. नागरिकांना बसण्यासाठी टाकलेल्या मॅटवरही पाणी साचले. साउंड सिस्टिम आणि विद्युत पुरवठा करणारी यंत्रणाही कोलमडली होती. त्यामुळे आयोजकांनी सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.