आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्ल्युझिव्ह : पर्यावरणपूरक कॉस्ट इफेक्टिव्ह घरांसाठी तरुण अभियंत्यांची चळवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - आपल्या अवतीभोवती बांधकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध असताना केवळ दिखाऊपणाच्या हव्यासापोटी ग्रामीण भागातही काँक्रीटची जंगले उभी राहिली आहेत. सिमेंटच्या या जंगलांनी घरांचं घरपण तर हिरावलंच, शिवाय आपल्याला निसर्गापासूनही दूर लोटलं. या परिस्थितीत आपल्याला पुन्हा निसर्गपूरक जीवनशैलीद्वारे शाश्वत विकासाकडे नेणार्‍या घरांची बांधणी करण्यासाठी ‘कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन’ नावाची चळवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील तरुण अभियंत्यांनी हाती घेतली आहे.
हवा आणि उजेडाचे योग्य संतुलन राखून पर्यावरणपूरक घरे बांधण्याच्या आपल्या पारंपरिक पद्धतीला लॉरी बेकर या वास्तुविशारदाने आधुनिक स्वरूप दिले. त्यांनी सुरू केलेली ही चळवळ पुढे नेण्याचे काम सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग येथील काही तरुण वास्तुविशारद करत आहेत. सांगलीतील प्रसन्न कुलकर्णी, सातार्‍याचा अद्वैत पाटणकर, आर्ज‍याचा (कोल्हापूर) धनंजय वैद्य आणि वेंगुल्र्याचा अजित परब हे वास्तुविशारद पाच वर्षांपूर्वी एकत्र आले. तिघांनीही सुरू केलेली घरबांधणीची पर्यावरण पूरक, पारंपरिक व आधुनिकतेचा मेळ घालणारी, बचत करणारी आहे. आता प्रवीण माळी, सायली व दर्शन जोशी, योगेश कुर्‍हाडे यांच्यासह काही तरुणही या चळवळीत सहभागी झाले आहेत. ‘अँप्रोप्रिएट कन्स्ट्रक्शन मूव्हमेंट’मध्ये अनिकेत गाडगीळ, रणजित म्हस्के आणि दर्शन जोशी हे तीन सॉफ्टवेअर इंजिनिअरही नोकरी सोडून सहभागी झाले आहेत.
काय आहेत फायदे ?
आरसीसी घरांसाठी लाखो रुपये खर्च करूनही लोखंड आणि काँक्रीटच्या अतिवापरामुळे उन्हाळ्यात ही घरे गरमच आणि थंडीत थंड पडतात. त्यामुळे कृत्रिम वातानुकूलन यंत्रणा बसवावी लागते.
याउलट कॉस्ट इफेक्टिव्ह घरांमध्ये दगड, मातीचा वापर केल्याने नैसर्गिकरीत्या वातानुकूलित राहतात. भूकंपाचा प्रतिरोध करण्याची आरसीसी घरांइतकीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त क्षमता या घरांची असते.
आरसीसी घरांचे आयुष्यमान साधारणत: 70 ते 80 वर्षे असते; मात्र कॉस्ट इफेक्टिव्ह घरे ही पारंपरिक बांधकाम तत्त्वाच्या आधारे बांधल्याने शेकडो वर्षे टिकाव धरू शकतात, असा या अभियंत्यांचा दावा आहे.
कॉस्ट इफेक्टिव्ह घरांच्या बांधकामासाठी दगड किंवा विटांचा वापर केला जातो. या बांधकामातील दगड, विटांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांना बाहेरून गिलावा टाळला जातो. आतूनही गिलावा टाळता येऊ शकतो.
बांधकाम खर्चात 25 टक्के बचत
ऊन, वारा, पाऊस याचा सर्मथपणे सामना करणारी या घरांची रचना असल्याने व आर्च, छत, भिंतींसाठी दगड, विटा आणि कौलांचा वापर केल्याने घराच्या नैसर्गिक सौंदर्यातही भर पडेल. ही घरे वायुव्हिजन आणि प्रकाशासाठी करावा लागणारा खर्च वाचवतात. या घरांच्या बांधकामात 25 टक्केबचतीचा दावा केला जातो.
यामुळे होते खर्चात बचत
परिसरातील साधनांचा वापर केल्याने वाहतूक खर्च वाचतो. स्लॅबमध्ये कौलांचा वापर केल्याने काँक्रीट, लोखंड कमी लागते. अद्वैत पाटणकर आणि प्रवीण माळी यांनी मातीच्या विटांची मजबुती वाढवण्यासाठी संशोधन करून स्टॅबिलाइज्ड मड ब्लॉक तयार केले. लोडबेअरिंग केल्याने लोखंड, काँक्रीटचा खर्च कमी होतो.
तुलनात्मक फरक
आरसीसी घर
0 प्रती चौरस फूट 1200 रुपये खर्च
0 भिंती व छतासाठी कॉलम व बीमचा वापर करावा लागतो
0 स्लॅबसाठी 100 टक्के लोखंड व काँक्रीटचा खर्चिक वापर
0 पायासाठी कॉलमचा वापर
0 फ्लोअरिंगसाठी महागड्या फरशा
0 हवा, सूर्यप्रकाशासाठी मोठय़ा खिडक्यांची उभारणी
0 देखणेपणासाठी भिंतींना आतून-बाहेरून गिलावा करावा लागतो
कॉस्ट इफेक्टिव्ह घर
0 प्रती चौरस फूट 900 रुपये खर्च
0 लोडबेअरिंगमुळे कॉलम, बीमची आवश्यकता नाही, आर्चचा वापर
0 आवश्यकता भासल्यास पिलर स्लॅब (स्लॅबच्या खालच्या बाजूने कौलांचा वापर केल्याने स्लॅबसाठी लोखंड आणि काँक्रीट कमी लागते, शिवाय स्लॅबचे वजन कमी होते.) अन्यथा कौलांचा वापर
0 दगड-माती किंवा दगड-वाळूचा वापर केला जातो.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमाकावर संपर्क साधता येईल. प्रसन्न कुलकर्णी 9890625371, धनंजय वैद्य 9423801164, अव्दैत पाटणकर 9850857162.