कोल्हापूर- कुरिअर कंपनीच्या गाडीवर दरोडा टाकून सव्वा दोन कोटी रुपयांचे दागिने पळवण्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. मात्र पोलिसांनी तातडीने हालचाली करून विमानतळ परिसरात हा सर्व मुद्देमाल शोधून काढला. तथापि दरोडेखोर सापडले नाहीत.
येथील भेंडे गल्लीतील साईनाथ एक्स्प्रेस सर्व्हिस कुरिअर कंपनीच्या कारमध्ये सुमारे ६१६ किलो चांदीचे दागिने, १४० ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच तांब्याच्या धातूचे २८ किलो दागिने होते. कोटी २१ लाख ६० हजार रुपये किमतीचे हे दागिने घेऊन कार जात असताना कारंडे मळा येथील जलशुद्धीकरण केंद्रजवळ पाठीमागून येणाऱ्या कारमधीलअज्ञातांनी ओम्नी अडवली. यातील चौघांनी पोलिस असल्याचे सांगत ओम्नीमधील तिघांनाही उतरवून दुसऱ्या कारमध्ये बसवले. संशयित मुद्देमालासहित ओम्नी कार विमानतळाच्या दिशेने घेऊन गेले, तर इतर संशयितांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावून पुणे-बेंगळुरू महामार्गावर सोडले. पार्सल गाडीचे अपहरण झाल्याचे कळवताच शाहूपुरी पोलिसांनी विमानतळ परिसरात शोध सुरू केला. काही अंतरावर रस्त्यालगत मुद्देमाल टाकून दिल्याचे आढळून आले. लक्ष्मीटेक येथे ओम्नीही सापडली. पोलिसांनी आता, चोरट्यांचा शोध घेत आहेत.
चोरटे ज्या मार्गाने शहराबाहेर गेले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज घेऊन संशयितांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या तिन्ही कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. कंपनीतील माहितगाराकडूनच हा प्रकार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.