आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीर गायकवाडचा जामीन फेटाळला, फरारी होण्याचा कोर्टाला संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- काॅ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन नाकारला आहे. ‘समीरला जामीन मिळाला तर साक्षीदारांवर दबाव येवू शकतो तसेच मडगाव स्फोटातील फरारी रुद्र पाटील याच्याप्रमाणे समीरही फरारी होवू शकतो,’ असा विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने समीरचा जामीन अर्ज फेटाळला.
समीरच्या जामीन अर्जावर चारच दिवसांपूर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एल. बी. बिले यांनी थेट निर्णय दिला. आता फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ‘पानसरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा समीरवर आरोप आहे. अशा परिस्थितीत त्याला जामीन मिळाला तर अपुऱ्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल. तसेच रुद्र पाटीलप्रमाणे समीरही फरारी होईल. समीरच्या विरोधात सबळ परिस्थितीजन्य पुरावा असताना त्याला सोडणे योग्य होणार नाही,’ अशी बाजू सरकारच्या वतीने अॅड. निंबाळकर यांनी मांडली होती. उच्च न्यायालयाचे या खटल्यावर नियंत्रण असून फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या वेळी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने झाली का याबाबतचा अहवाल कर्नाटक पोलिसांकडून सादर केला जाणार आहे. तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी राजारामपुरी पोलिसांना साक्षीदाराच्या सुरक्षेबाबत पत्र पाठवले असून त्यावर काही सामाजिक संघटनांनी अाक्षेप घेतला अाहे. हे पत्र म्हणजे अप्रत्यक्ष धमकीच अाहे असा अाराेप केला जात अाहे. त्यामुळे समीर याला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे. हे सरकारी पक्षाने मांडलेले सर्व मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयाने समीरचा अर्ज फेटाळला.

निर्णयावर समाधानी : पानसरे
न्यायालयाच्या या निर्णयावर आम्ही पानसरे कुटुंबीय समाधानी आहोत. काही गोष्टी स्वच्छ दिसत असल्याने न्यायालयाने योग्य निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाचेही यावर असलेले निर्णय संयुक्तिक ठरत असल्याची प्रतिक्रिया गाेविंद पानसरे यांच्या स्नुषा मेधा यांनी व्यक्त केली.