आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Standing In Sangali Municipal Corporation Election

सांगली मनपा निवडणुकीच्या रिंगणात गुंडांचा भरणा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना आणि मनसेनेही गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपप्रणीत स्वाभिमानी आघाडीने मात्र गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांना थारा दिलेला नाही.


सांगली महापालिकेसाठी 7 जुलै रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपप्रणीत स्वाभिमानी विकास आघाडी अशी तिरंगी होत आहे. शिवाय मनसे (37 जागांवर) आणि शिवसेनेनेही (21 जागांवर) स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. नुकतेच सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून त्यात राष्‍ट्रवादी कॉँग्रेसकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते.


राष्‍ट्रवादीने दिलेल्या 10 उमेदवारांवर खून, खुनाचा कट-प्रयत्न, सावकारी, फसवणूक, खंडणी, शासकीय कर्मचा-यांना मारहाण, रॉकेल तस्करी, जुगार अड्डा, वाहनांची चोरी, शस्त्र तस्करी अशा गंभीर प्रकरणात गुन्हे नोंद आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीच्या यादीतील अट्टल गुन्हेगार बाळू भोकरे याचाही त्यात समावेश आहे. माजी महापौर मैनुद्दीन बागवान हा तर मिरज दंगलीचा सूत्रधार असल्याचा आरोप तत्कालीन पोलिस अधीक्षकांनीच केला होता. तोही राष्‍ट्रवादीच्या यादीत आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व गृहमंत्री आर. आर. पाटील हे दोघे राष्‍ट्रवादीचे नेते सांगलीचेच रहिवासी आहेत. त्यामुळे या मंत्र्यांना अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.


कॉँग्रेस पक्षानेही गुंडांना उमेदवारी दिली असली तरी राष्‍ट्रवादीच्या तुलनेत त्यांची संख्या कमी दिसते. जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेला एक माजी नगरसेवक आणि गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेला एक उमेदवार अशा दोघांना कॉँग्रेसने तिकीट दिले आहे. तर मनसेच्या 37 उमेदवारांत तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. शिवसेनेच्या 21 उमेदवारांत मिरज दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेले दोघेजण आहेत.


एकाच घरातील चार-पाच उमेदवार
या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून घराणेशाहीलाही खतपाणी घातले गेले आहे. महापौर इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांची पत्नी व आईला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह पत्नी, भाऊ, भावजय अशा एकाच घरातील चौघांना उमेदवारी दिली आहे. नगरसेवक धनपाल खोत यांनी तर स्वत:सह घरातील पाच सदस्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. सर्वच पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकिटे देण्यात आली आहेत.