आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Women Village President Oppose To Flag Ceremony At Sangali

दलितास झेंडा वंदनापासून रोखले, पती निधनानंतर कुप्रथांना विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- मिरज तालुक्यातील आरग येथे दलित समाजातील महिला सरपंचाला राष्ट्रध्वज फडकवण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. तर दुसरी घटना स्त्रिया पुरोगामित्वाचे एक पाऊल पुढे टाकत असल्याची प्रचिती देणारी घडली. इस्लामपूर येथील नगरसेविकेने पतीच्या निधनानंतर कुंकू पुसण्यास आणि मंगळसूत्र काढून टाकण्यास नकार दिला.

स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवण्याचा मान आणि घटनात्मक अधिकार सरपंचाला असतो. त्यानुसार मिरज तालुक्यातील आरग येथे सरपंचपदी असलेल्या विशाखा कांबळे यांनी ध्वजाला हळदी-कुंकू लावून पूजन करायचे आणि ध्वज फडकवायचा, तर उपसरपंच अनिल कोरबू यांनी ध्वजाला नारळ वाढवायचा, असे ठरले. पण कोरबू याने नारळ वाढवला आणि लगेचच स्वत:च ध्वज फडकवला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोरबू ज्या पॅनलमधून निवडून आला, त्या पॅनलला ग्रामपंचायतीत बहुमत आहे. मात्र सरपंचपदासाठीच्या आरक्षित गटातील उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने नाइलाजाने विशाखा कांबळे या विरोधी पॅनलमधील सदस्य महिलेला सरपंच करण्यात आले. याची सल सत्ताधारी गटाला आहे. त्यातून शनिवारी कांबळे यांना ध्वज फडकवण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सत्ताधाऱ्यांच्या या दुजाभावाचा निषेध म्हणून ग्रामसभाही रद्द करण्यात आली आहे. उपसरपंच जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत ग्रामसभा होऊ देणार नाही, असा विरोधकांनी पवित्रा घेतला आहे.
समाजातून पाठिंबा
इस्लामपूर येथील नगरसेविका कविता पाटील यांचे पती राजेंद्र यांचा दोन दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायातून खून झाला. रक्षाविसर्जनादिवशी प्रथेप्रमाणे पत्नीच्या बांगड्या फोडून, कुंकू पुसले जाते व मंगळसूत्र काढले जाते. मात्र, पुरोगामी विचारसरणीत वाढलेल्या कविता पाटील यांनी यास नकार दिला. समाजातील ज्येष्ठ मंडळींनीही पाठिंबा दिला. कविता या व्ही.वाय. पाटील या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मुलगी. लहानपणापासून त्यांच्यावर शाहू, फुले यांच्या पुरोगामी विचारांचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला नातेवाईक आणि लोकांकडूनही पाठिंबा मिळाला.