Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Darshan Shah Murder Case

दर्शन शहा खून प्रकरण: आरोपीला जन्मठेप, 1 लाख 5 हजार रुपयांचा दंडही

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 15:50 PM IST

  • खून झालेला चिमुकला दर्शन शहा.
कोल्हापूर- अवघ्या 10 वर्षे वयाचा शाळकरी मुलगा दर्शन रोहीत शहा (वय 10, रा. देवकर पाणंद) याचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याला आज मंगळवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाख 5 हजार रुपये दंड ठोठावला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी हा निकाल आज दिला. आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा दर्शन शहा याची आजी आणि आईने व्यक्त केली होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, शाळकरी मुलगा दर्शन शहा याचे 25 डिसेंबर 2012 मध्ये तो राहत असलेल्या परिसरातील योगेश उर्फ चारू चांदणे याने अपहरण केले होते. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर 25 तोळे खंडणीची मागणी करणारी चिठ्ठीही मिळाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करून चारू चांदणे या आरोपीला अटक केले होते. मार्च 2013 मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

जानेवारी 2016 पासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली, मात्र चारू चांदणे याने आरोप फेटाळून नार्को आणि ब्रेन मॅपिंगची मागणी केली होती. 2 ऑगस्टपासून खटल्याची नियमित सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयात 30 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 22 पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परिस्थितीजन्य पुरावेही मांडले.

काल सोमवारी या खटल्यावर निकाल् होण्याची शक्यता होती, त्यामुळे आरोपी चांदणे याला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश बिले यांनी आरोपी चांदणे याला या गुन्ह्यात दोषी ठरल्याचे संगितले होते. आरोपीला त्याचे मत मांडण्याची संधी दिली होती , मात्र सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीला थांबवत मत व्यक्त करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

यावर न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचे मत जाणून घेतले. आरोपीस वेळ मिळावा यावर कोणालाच आक्षेप नसल्याने न्यायाधीश बिले यांनी कामकाज तहकूब करून पुढील सुनावणी मंगळवारी होईल, असे सांगितल होते. त्यावर आज कामकाज होत न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. आरोपीचे वकील पीटर बारदेस्कर यांच्यासह आरोपीचे नातेवाईकही आज न्यायालयात उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended