आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Death Solider Kundalik Mane Family Doesn\'t Recovery Itself From Accident

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहीद कुंडलिक माने यांच्या कुटूंबीयांचा हुंदका घशातच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - सगळं गाव गलबलून गेलंय.. प्रत्येकाचे डोळे भरून आलेत, मात्र रडता येत नाही.. अशी विचित्र अवस्था शहीद कुंडलिक माने यांच्या पिंपळगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांची झाली आहे. याहूनही विचित्र अवस्था आहे माने कुटुंबीयांची.. पार्थिव गावात कधी येणार याची माहिती नसल्याने ग्रामस्थांनी माने कुटुंबीयांच्या काळजीपोटी त्यांना ही कटू बातमी सांगितलेलीच नाही.

पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले, त्यात कागल तालुक्यातील पिंपळगावच्या कुंडलिकचा समावेश असल्याच्या बातम्या वाहिन्यांवरून झळकू लागल्या आणि ग्रामस्थांच्या हृदयात धस्स झाले. कुंडलिक याचे सहकारी, बटालियन या ठिकाणी फोनाफानी झाल्यानंतर दुर्दैवाने बातमी खरी ठरली. कुंडलिकच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, आठ वर्षाची मुलगी व पाच वर्षाचा मुलगा आहे.

कुंडलिकचे पार्थिव कधी येणार याची माहिती नव्हती. त्यामुळे आताच ही माहिती सांगितली तर घरच्यांची अवस्था काय होणार या भीतीने ग्रामस्थही शहारले. जोपर्यंत पार्थिव येत नाही तोपर्यंत घटनेची माहिती माने परिवाराला न देण्याचे ज्येष्ठ लोकांनी ठरवले. गल्लीतील केबल बंद करण्यात आली. वृत्तपत्रे टाकली नाहीत. तरुण मंडळाच्या मुलांनी तर गल्लीच्या तोंडाशी मुक्कामच ठोकला. पार्थिव येईपर्यंत दोन दोन दिवस होणारा आक्रोश आणि त्याचा कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता अशी काळजी घेण्यात आली.

लोकप्रतिनिधींना रोखले
ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह काही लोकप्रतिनिधी गावात आले, परंतु त्यांनाही गावकर्‍यांनी कुटुंबीयांना न भेटण्याची विनंती केली. गावातील हालचाली पाहता माने कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी पोलिस पाटील, सरपंचांना विचारले, तेव्हा कुंडलिक जखमी झाला असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दु:ख अन् अभिमानही
मंगळवारी दुपारपासूनच ओबी व्हॅन्स पिंपळगावात दाखल झाल्या. मात्र पत्रकारांना मानेंच्या घरी न जाण्याची विनंती करण्यात आली. सर्वांनीच ग्रामस्थांच्या भावनांचा आदर केला. कुंडलिकच्या वीरमरणाचा धक्का कुटुंबीयांना बसू नये यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते. गावच्या सुपुत्राला आलेले वीरमरण एकीकडे ग्रामस्थांच्या डोळय़ात पाणी आणत आहे तर दुसरीकडे भारतमातेच्या रक्षणासाठी भूमिपुत्र शहिद झाल्याची अभिमानाची भावनाही आहे.

आज होणार अंत्यसंस्कार
दिल्लीहून बुधवारी सायंकाळी कुंडलिक यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. गुरुवारी पहाटे ते कोल्हापुरात व नंतर पिंपळगावला नेण्यात येणार आहे. गुरुवारीच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. गावातील प्राथमिक शाळेशेजारील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी चौथरा उभारण्यात आला आहे.